नातेवाईकांच्या मानसिक ताणात भर

नाशिक : जिल्हा परिसरात करोनाचा उद्रेक मोठय़ा प्रमाणावर होत असतांना या परिस्थितीत रुग्णांच्या नातेवाईकांना मार्गदर्शनासाठी आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासनासह इतर विभाग सक्रिय असल्याचा दावा करण्यात येत असला तरी रुग्ण तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना वेगळाच अनुभव येत आहे. रुग्णांसाठी आश्वासक मदतीचा हात देणाऱ्यांचे भ्रमणध्वनी संबंधित व्यक्ती संपर्क क्षेत्राबाहेर, बैठकीत अडकलेली असल्याचे संदेश देत असल्याने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हतबल झाले आहेत.

शहर परिसरात करोनाचा उद्रेक मोठय़ा प्रमाणात होत आहे. रेमडेसिविर, प्राणवायू, खाट मिळवण्यासाठी रुग्ण तसेच रुग्णांच्या नातेवाईकांची फरपट होत आहे. त्यात अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. काहींचा जीव टांगणीला लागलेला, अशी स्थिती असतांना रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी असणारे प्रशासनाचे मदतीचे हात मात्र यापासून दूरच आहेत.

प्रशासनाकडून मदतीसाठी नेमणूक झालेल्या अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक सातत्याने व्यस्त, संपर्क क्षेत्राबाहेर असल्याचे संदेश देतात. ज्यांच्याशी संपर्क होतो, ते उडवाउडवीची उत्तरे देतात. काही जणांकडून आपण बैठकीत असल्याचे सांगितले जाते. रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून खाटा कुठे शिल्लक, करोना उपचार केंद्रात काय स्थिती, रक्तद्रवची काय स्थिती, शववाहिका हवी, रुग्णवाहिका हवी, असे सातत्याने भ्रमणध्वनी येत असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ते घेणे सोडून दिले आहे. संबंधितांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने कामात अडचणी येत आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयातील अधिकाऱ्यांकडून बैठकीत असल्याचे सातत्याने सांगितले जाते. तर काही अधिकारी आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी टाकू न अंग झटकतात. झाकीर हुसेन रुग्णालयातील घटनेनंतर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील ताण कायम असून कुठल्याही चौकशीसाठी भ्रमणध्वनी के ल्यास वरिष्ठांशी बोला असे सांगून बोळवण के ली जाते. अधिकाऱ्यांकडून आम्हांला वैयक्तीक आयुष्य आहे, कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत, अशी कारणे दिली जातात. महापालिकेचे अधिकारी, संबंधित यंत्रणेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. अन्न व औषध प्रशासन विभागाचे संबंधित अधिकारी भ्रमणध्वनी उचलत नसल्याची अनेकांची तक्रार आहे. ग्रामीण भागात अधिकाऱ्यांकडून उत्तरे मिळत नसल्याने रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून नाशिकमध्ये धाव घेतली जाते. मात्र येथेही त्यांची फरपट कायम होते. लोकप्रतिनिधींकडून राजकीय बळाचा वापर करण्याचा प्रयत्न होतो. परंतु, यामध्ये रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांची ससेहोलपट दुर्लक्ष करण्यासारखी नाही. अधिकारी, कर्मचारी सातत्याने येणाऱ्या कामाच्या ताणामुळे खचले आहेत.

माणूस म्हणून लक्षात घ्या..!

आमच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. दिवसभरात सातत्याने दूरध्वनी खणाणत असतो. समोरच्याने आपला दूरध्वनी उचललाच पाहिजे, अशी गैरसमजूत अनेकांनी करून घेतली आहे. अधिकारी, कर्मचारी हेही माणसे आहेत. त्यांना वैयक्तीक आयुष्य आहे. कामाचा ताण हलका करावा यासाठी कोणाकडे वेळ नाही. सध्या युध्दजन्य परिस्थिती आहे ती हाताळण्यापलिकडे उपाय नाही. जखमा दुरूस्त करण्याची ही वेळ नाही. कोणी भावनिक-मानसिक रित्या दुखावले असले तरी ही परिस्थिती काम करण्याची आहे. ही जाण प्रत्येकाला आहे. यामुळे माणूस म्हणून समजून घ्यावे ही अपेक्षा.

डॉ. नीलेश जेजूरकर (मानसोपचारतज्ज्ञ)