नेचर क्लब ऑफ नाशिकच्या उपक्रमात मंथन; नर्सरी परिसरात निरीक्षण
शहर आणि परिसरात फुलपाखरांची संख्या झपाटय़ाने कमी होत असून त्यांना वाचविण्याची वेळ आल्याची बाब नेचर क्लब ऑफ नाशिकने अधोरेखित केली आहे. फुलपाखरू संवर्धन दिनानिमित्त ‘चला फुलपाखरू बघू या.’ या उपक्रमादरम्यान फुलपाखरांना वाचविण्यासाठी काय करता येईल, याकडे लक्ष वेधण्यात आले. या वेळी गोदापार्क, सामाजिक वनीकरण विभागाची नर्सरी परिसरात फुलपाखरांचे निरीक्षणही करण्यात आले.
‘चॅरेटी बटरफ्लाय कॉन्झर्वेशन’ने केलेल्या सर्वेक्षणात देशातील फुलपाखरांची संख्या २० टक्क्यांनी कमी झाली असल्याचे जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने शहरात अभ्यास केला असता अनेक वनस्पती व वृक्ष नष्ट झाल्याने अनेक फुलपाखरांच्या जातींवर त्यांचा विपरीत परिणाम झाल्याचे आढळून आले. शेतीसाठी वापरली जाणारी कीटकनाशके ही फुलपाखरांच्या जीवावर उठली आहेत. त्याचप्रमाणे फुलपाखरांच्या प्रजननासाठी आवश्यक असलेल्या वनस्पती, वृक्ष, पाने, फुले मोठय़ा प्रमाणात तोडली गेल्याने व सिमेंटच्या जंगलाच्या वाढता पसाऱ्यामुळे, जमिनीवरील पेव्हर ब्लॉक आदी कारणांमुळे काही फुलपाखरांच्या प्रजाती धोक्यात आल्या आहेत.
वातावरणातील बदलामुळे परागीकरणाचे काम मंदावल्याने परिस्थिती गंभीर होत आहे. सर्वेक्षणात मागील वर्षी कॉमन बेरोन या फुलपाखराने त्याचे प्रजननाचे झाड आंब्याला सोडून चक्क कीटक रोगांना पळविणाऱ्या तुळशीवर कोश तयार केल्याचे निदर्शनास आले. जीन अलेक्झांड्रिया हे जगात आढळणारे सर्वात मोठे फुलपाखरू तर वेस्टर्न पिगमी ब्लू हे सर्वात लहान फुलपाखरू. भारतात सुमारे १५०० जातींची फुलपाखरे आढळतात. त्यांपैकी महाराष्ट्रात ३५० जातींची आणि नाशिकमध्ये अंदाजे १५० हून अधिक जाती प्रामुख्याने दिसतात. नाशिकचे विविध बगीचे, घराजवळील बाग, तसेच अंजनेरी, वघेरा, पेठचा घाट, भंडारदरा, इगतपुरी, हरसुल आदी भागांत भ्रमंती केल्यास फुलपाखरांच्या अनेक जाती बघावयास मिळतात.
गेल्या चार वर्षांपासून फुलपाखरांची संख्या झपाटय़ाने कमी होत असल्याचे पुढे येत आहे. या उपक्रमात एका दिवसात वीस जातींची फुलपाखरे बघण्याची संधी नाशिककरांना मिळाली.
फुलपाखरांची घटलेली संख्या पाहता या कीटकांना वाचविण्याची वेळ आली आहे. प्रत्येकाने पावसाळ्यात एक तरी वृक्ष लावल्यास फुलपाखरे भविष्यात बागडताना दिसतील अशी अपेक्षा क्लबचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यांनी व्यक्त केली.
या वेळी उपस्थितांना त्यांनी फुलपाखरांच्या विविध प्रजातींची माहिती दिली. या वेळी उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, प्रमिला पाटील, सागर बनगर आदी पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

हे करता येईल
* फुलपाखरांना हव्या असणाऱ्या वनस्पती, वृक्ष लावणे
* फुलपाखरांचा बगीचा तयार करणे
* वनस्पतिशास्त्राच्या विद्यार्थ्यांकडून फुलपाखरांचे सर्वेक्षण
* नाशिक महानगर पालिकेच्या बगीच्यांमध्ये फुलझाडांची लागवड
* पर्यावरणप्रेमींकडून फुलपाखरांच्या विविध प्रजांतीचा अभ्यास