संगणकावरील कळ दाबण्यासाठी मुख्यमंत्री समोर उभे ठाकलेले आणि अचानक ‘नेट’ची ‘कनेक्टिव्हिटी’ अंतर्धान पावली.. तज्ज्ञांकडून ती पुन्हा प्राप्त करण्याचा प्रयत्न झाला; परंतु पाच ते सात मिनिटे होऊनही ‘कनेक्टिव्हिटी’ काही मिळेना.. यामुळे तज्ज्ञांसह उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांचे चेहरेही तणावग्रस्त झाले.. या वेळी स्मितहास्य करत उभ्या राहिलेल्या मुख्यमंत्र्यांनी खिशातून स्वत:चा भ्रमणध्वनी बाहेर काढला आणि त्याचे ‘वायफाय’ सुरू केले.. मग संगणकतज्ज्ञांनी तीन ते चार मिनिटांत त्यांच्या भ्रमणध्वनीवरून ‘कनेक्टिव्हिटी’ घेतली आणि सर्वाचा जीव भांडय़ात पडला.
हा प्रकार घडला महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या दीक्षांत सोहळ्यानंतर ई-लर्निग उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात. ‘नेट कनेक्टिव्हिटी’अभावी मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री तथा गृहराज्यमंत्री अशा सर्वाना जवळपास १० ते १५ मिनिटे ताटकळत राहावे लागल्याने उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांवर कमालीचे दडपण आले. तथापि, देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न सहजतेने सोडवला. त्यांच्याच भ्रमणध्वनीवरून ‘वायफाय’ जोडणी देऊन हा उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला. या वेळी बोलताना त्यांनी ऐनवेळी उद्भवलेल्या स्थितीचा उल्लेख केला. महाराष्ट्र पोलीस अकादमीत लीज लाइनची जोडणी आहे. उद्घाटन सोहळा मोकळ्या जागेत करावयाचा असल्याने ‘डोंगल’द्वारे जोडणी घेणे क्रमप्राप्त ठरले; परंतु पुढील वेळी असा कार्यक्रम प्रबोधिनीतील सभागृहात घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. ई अकॅडमी प्रणालीचा प्रभावीपणे वापर होण्यासाठी ‘ब्रॉडबँड लीज लाइन’चा वापर करावा, असेही त्यांनी सूचित केले.
प्रबोधिनीच्या ई-लर्निग उपक्रमाच्या माध्यमातून जगभरातील ज्ञानभांडार पोलीस अधिकाऱ्यांसाठी खुले झाले असून त्याचा सर्वानी उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांना ई-शिक्षण प्रणालीत नियमित प्रशिक्षण मोडय़ूल, सेवांतर्गत प्रशिक्षण मोडय़ूल, पोलीस ठाणे व्यवस्थापन आदी विभाग करण्यात आले आहेत. या माध्यमातून कायदेविषयक पोलीस नियमावली, गुन्हे प्रतिबंध, सायबर क्राइम, आर्थिक गुन्हे, सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था, मानवी वर्तवणूक यांचे उदाहरणांसह शिक्षण देण्यासाठी उपयोग होणार आहे. टॅब, लॅपटॉप, संगणक व भ्रमणध्वनी या आधुनिक साधनांच्या माध्यमातून डिजिटल तंत्राचा वापर शिक्षणासाठी करण्यात येणार आहे.