त्र्यंबकेश्वर, कावनई मंदिरांसह ब्रम्हगिरी प्रदक्षिणाही बंद
नाशिक : बारा ज्योतिर्लिगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये श्रावण महिन्यात होणारी गजबज यंदा करोनामुळे बंदच आहे. श्रावणात ब्रह्मगिरी प्रदक्षिणा, त्र्यंबकेश्वर, कावनई येथे दर्शनासाठी गर्दी होत असते. करोनाचा संसर्ग फैलावू नये म्हणून ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसह त्र्यंबकेश्वर, कावनई मंदिर बंदच ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
श्रावणात शिवशंकर पूजेला विशेष महत्त्व असते. त्र्यंबकेश्वरात श्रावणात दर्शनासाठी येण्यास भाविकांच्या दृष्टीने अधिक महत्त्व आहे. श्रावणातील सर्व सोमवारी तर गर्दीचा उच्चांक असतो. याव्यतिरिक्त श्रावणात लघुरुद्र, रुद्राभिषेक यासह अन्य विधी सुरू राहतात. काही जणांकडून ब्रह्मगिरी परिसरात दर श्रावणी सोमवारी प्रदक्षिणा घालण्यात येते. भाविकांची गर्दी पाहता त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी राज्य परिवहनच्या वतीने जादा बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात येते. त्र्यंबकेश्वरसह इगतपुरी येथील कावनई परिसरातही भाविकांची गर्दी होते. यंदा मात्र या सर्व उत्सवावर करोनाचे सावट आहे.
जिल्ह्य़ातील सर्वच देवळे बंद आहेत. नैमित्तिक पूजा सुरू असल्या तरी भाविकांना दर्शन घेण्यासाठी मंदिर अद्याप खुले नाही. श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी खुले करावे, अशी मागणी स्थानिकांसह, व्यावसायिक, भाविकांनी केली होती. मंदिर व्यवस्थापनाकडून या अनुषंगाने भाविकांची होणारी गर्दी, त्यांच्या शरीरातील तापमानाची नोंद, हात निर्जंतुकीकरण, सामाजिक अंतर
पथ्य अशी सर्व व्यवस्था, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येणार होत्या. जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून श्रावणात काय करता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येणार होते.
वरिष्ठ पातळीवर देवस्थान पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या चर्चेत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय झाला. करोनाचा वाढता संसर्ग पाहता त्र्यंबकेश्वर मंदिर बंदच राहणार आहे.
या संदर्भात झालेल्या बैठकीत ब्रह्मगिरी प्रदक्षिणा बंदी, तसेच श्रावण काळात सर्व मंदिर बंद ठेवण्यात येणार आहेत. केवळ त्रिकाल पूजा, श्रावणातील पूजा, पालखी सोहळा आदी विधी होतील. यामुळे भाविकांचा हिरमोड झाला आहे.
राज्य परिवहनच्या उत्पन्नावर पाणी
यंदा करोनामुळे प्रवासी वाहतूक बंद आहे. एरवी श्रावणात त्र्यंबकेश्वर, इगतपुरी येथील शिवमंदिरांसह अन्य ठिकाणी होणारी भाविकांची गर्दी पाहता राज्य परिवहनच्या नाशिक आगाराकडून विशेष व्यवस्था करण्यात येते. जादा गाडय़ा सोडण्यात येतात. मागील वर्षी जिल्हा परिसरात १९ हजाराहून अधिक प्रवाशांची वाहतूक करत ६४ लाखांचे उत्पन्न अवघ्या महिनाभरात कमावले. यंदा मात्र करोनामुळे या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे.