लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : शेतकऱ्यांकडून पीक, भाजीपाला, फळे खरेदी करूनही त्यांना व्यवहारात ठरलेले पैसे न देण्याचे प्रकार घडत असून नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महासंचालकांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले असतानाही व्यापाऱ्यांकडून फसवणुकीचे प्रकार सुरूच असल्याचे जिल्ह्य़ात घडलेल्या दोन घटनांमधून उघड झाले. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात येत आहे.

नाशिक जिल्हा भौगोलिकदृष्टय़ा सुजलाम सुफलाम असल्याने शेतकऱ्यांकडून कांदा, टोमॅटो, द्राक्षे, खरबूज आदी पिके  आणि फळांचे उत्पादन घेतले जाते. वर्षभर कठोर परिश्रम करून आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देत उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकण्यासाठी व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. व्यापाऱ्यांकडून नेमका याचा फायदा घेतला जातो. शेतकऱ्यांना व्यापारातील खाचखळगे माहीत नसल्याने व्यापाऱ्यांकडून त्यांना वेगवेगळी कारणे देत फसवणुकीचे प्रकार घडतात. जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांची मोठय़ा प्रमाणावर फसवणूक के ली जाते. शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रमाण जिल्ह्य़ात अधिक असल्याने परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक दिघावकर यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आणि शेतकऱ्यांनी त्यासाठी तक्रोर करण्याचे आवाहन के ले होते. दिघावकर यांच्या आवाहनाला शेतकऱ्यांकडून प्रतिसादही मिळू लागला आहे.

व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या फसवणुकीबद्दल शेतकरी आता आवाज उठवू लागले आहेत. त्यामुळेच  अलिकडे नाशिक ग्रामीणमध्ये वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. नुकतेच शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. सिन्नर येथील बाळू वाजे यांनी कोबी पीक घेतले. संशयित शकील करीम सय्यद (रा. नाशिक) या व्यापाऱ्याशी त्यांनी शेतमाल खरेदीविषयी चार लाख ६७ हजार रुपयांचा व्यवहार के ला. वाजे यांच्याकडून कोबी खरेदी करून आठ दिवसांत पैसे आणून देण्याचे आश्वासन देत सय्यद कोबी घेऊन गेला. आठ दिवस उलटल्यानंतर वाजे यांनी संबंधिताकडे पैशांची मागणी के ली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वाजे यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात संशयित सय्यदविरुद्ध तक्रोर दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत येवला तालुक्यातील धुळगाव येथील प्रतीक गायकवाड यांनी सुरेंद्र सूर्यवंशी (रा. येवला) या व्यापाऱ्याशी खरबूज विक्रीचा व्यवहार के ला. व्यवहारात ठरल्यानुसार ३९ क्विंटल माल ३९,२५० रुपयांना  सूर्यवंशी विक्रीसाठी घेऊन गेले. चार महिने उलटूनही सूर्यवंशीने पैसे न दिल्याने गायकवाड यांनी पोलीस ठाणे गाठत तक्रोर दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल के ला आहे.

कांदा खरेदीत शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्यास अटक

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : कांदा व्यापारी असल्याचे भासवत शेतकऱ्याकडील ६० गोणी कांदा घेऊन त्याचे पैसे न देता पसार झालेल्या संशयितास पोलिसांनी भिवंडीतून अटक केली आहे. संशयिताने मालेगाव, सटाणा, कन्नड, औरंगाबाद येथेही अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले आहे. या संदर्भात देवळा तालुक्यातील नानाजी साळवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गेल्या महिन्यात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

साळवे हे शरदचंद्र पवार बाजार समितीत २९ क्विंटल कांदा विक्रीसाठी घेऊन आले होते. हा कांदा इजियाज अन्सारी या संशयिताने २७ रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करून प्रत्यक्षात २० रुपये किलोने त्याची विक्री केली. या व्यवहारातील ५८ हजार ५०० रुपयांची रक्कम न देता संशयित फसवणूक करून पसार झाला. संशयिताचा कोणताही ठावठिकाणा माहिती नसताना पंचवटी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे सहायक निरीक्षक सत्यवान पवार, शिपाई विलास चारोस्कर, नितीन जगताप आदींच्या पथकाने सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे त्याचा शोध सुरू केला.

त्या वेळी संशयिताचे नाव इजाज उस्मान मन्सुरी असल्याचे निदर्शनास आले. नंतर संशयित वापरत असलेल्या भ्रमणध्वनीचा क्रमांक मिळवून त्याचा तांत्रिक शाखेच्या मदतीने तपास केला असता तो गुजरात, मुंबई, ठाणे, भिवंडी या परिसरात असल्याचे दिसत होते. पोलीस पथकाने भिवंडी येथून संशयिताला ताब्यात घेतले. संशयित इजाज उस्मान मन्सुरी हा मूळचा नाशिकचा असून सध्या तो फिरस्ता असल्याचे उघड झाले आहे. तसेच या व्यतिरिक्त मालेगाव, सटाणा, कन्नड, औरंगाबाद येथे यापूर्वी त्याने अशा प्रकारचे गुन्हे के ले असल्याची माहिती मिळाली. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, उपायुक्त अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने संशयिताला जेरबंद करण्यात यश मिळवले.