भाजप-सेना युतीबद्दल चर्चा सुरू झाली आहे. मित्र पक्षांच्या जागा वाटपाबद्दल मतभेद नाहीत. शिवसेना-भाजपमध्ये निम्म्या निम्म्या जागा वाटपाचे सूत्र ठरलेले नाही. कोणी काहीही म्हटले तरी त्यास अर्थ नाही. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामार्फत जे निश्चित होईल, तेच युतीचे जागा वाटपाचे अंतिम सूत्र राहणार असल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

अलीकडेच शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीवेळी सेना-भाजपमध्ये निम्म्या निम्म्या जागा लढण्याचे ठरल्याचा दाखला दिला होता. परंतु, त्यास महाजन यांनी नकार दिला. गेल्यावेळी भाजपने १२३ जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेला ६२ जागांवर यश मिळाले. मुंबईतील काही जागा भाजपकडे आहेत. काही जागांवरून मतभेद स्वाभाविक असले तरी त्यातून वरिष्ठांकडून तोडगा काढला जाईल. नाशिक महापालिकेत विविध विषयांवरून भाजपचे पदाधिकारी आणि आमदारांमध्ये वादविवाद होत आहे. स्मार्ट सिटी कंपनीच्या कामाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर महाजन यांनी आमदारांनी महापालिकेच्या कामात अधिक लक्ष घातल्याने अडचणी निर्माण होत असल्याचे नमूद केले. आमदारांनी महापालिकेत पूर्णवेळ लक्ष देऊ नये. विधानसभा क्षेत्रात लक्ष द्यावे. आपआपसातील वाद टाळण्यासाठी नगरसेवक, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना काही गोष्टी सांगितल्या जातील. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत दीड हजार कोटींच्या कामाचे भूमिपूजन होत असल्याचे ते म्हणाले. उत्तर महाराष्ट्रात उमेदवारी देताना पाच-दहा वर्षांतील काम, प्रामाणिकपणा, गुणवत्ता आणि निवडून येण्याची क्षमता या निकषावर तिकीट वाटप केले जाणार असल्याचे त्यांनी सूचित केले. उत्तर महाराष्ट्रात तीन-चार जागांचा अपवाद वगळता युती सर्व जागांवर विजय संपादन करेल, असेही महाजन यांनी सांगितले.

अनुपस्थितीबद्दल नाराजी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शनिवारी आयोजित मेळाव्यात बूथप्रमुखांची अल्प उपस्थिती पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नाराजीचे कारण ठरली. निवडणूक ही मुख्यत्वे बूथ प्रमुखांच्या बळावर लढविली जाते. ज्यांच्या भरवशावर आपण निवडणूक लढवितो, शब्द देतो, त्या मंडळींनी मेळाव्याकडे पाठ फिरवल्याबद्दल महाजन यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघ बूथ प्रमुखांचा मेळावा आशादीप मंगल कार्यालयात झाला. बूथप्रमुखांच्या बळावर आपण वरिष्ठांना शब्द देतो, तो कसा पूर्ण करता येईल, असा प्रश्नही उपस्थित केला. नंतर नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातील बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले.