येवल्यातील हल्लाबोल सभेत जितेंद्र आव्हाड यांची टीका

विकासाला राष्ट्रवादीचा विरोध नाही. परंतु, शेतकऱ्यांचा विरोध असताना एक इंचही जमीन सरकार घेणार असेल तर ते आम्ही सहन करणार नसल्याचे राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी म्हटले असताना दुसरीकडे आ. जितेंद्र आव्हाड यांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाचा विषय मांडत ही केवळ नागपूरची समृद्धी असल्याचे सांगत भाजपवर शरसंधान साधले.

नगर जिल्ह्य़ातून राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचे सायंकाळी नाशिक जिल्ह्य़ातील येवल्यात आगमन झाले. यावेळी आयोजित जाहीर सभेस खा. सुप्रिया सुळे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक, आ. जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.

भू संपादन प्रक्रिया सुरू असताना पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी नियम धाब्यावर बसवत जमीन खरेदी केली. त्याबाबतची कागदपत्रे सादर करूनही भाजपने त्यांच्यावर कारवाई केली नसल्याचे त्यांनी सूचित केले.

दरम्यान, शनिवारी सकाळी निफाड, दुपारी दिंडोरी आणि सायंकाळी कळवण येथे जाहीर सभा झाल्यावर सप्तश्रृंगी गडावर यात्रेचा मुक्काम होईल. रविवारी हल्लाबोल यात्रा सटाणा येथे दाखल होणार असून येथे सभा होईल. त्यानंतर यात्रा उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहे. १० मार्च रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत नाशिक येथे जाहीर सभा होणार आहे.

भाजपच्या धोरणांवर टीका

आव्हाड यांनी समृध्दीच्या मुद्यावरून भाजपवर टिकास्त्र सोडले. समृध्दी महामार्गामुळे सिन्नर, कोपरगाव तालुक्यातील गावे उद्ध्वस्त होणार आहेत. शेतकरी कुटुंबांनी काबाडकष्ट करून शेती उभी केली. त्या जमिनीचे पाच पट पैसे देऊन काय साध्य होईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सभेत सर्वानीच सत्ताधारी भाजपच्या धोरणांवर टीका केली. विरोधात असताना भाजपने राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर आरोपांची राळ उडविली होती, अशी आठवण करून देत नवाब मलिक यांनी भाजपच्या मंत्र्यांवरील आरोपांचे दाखले दिले.