आठ महिन्यांनंतर शोध

मूल होत नसल्याने अपहरण

मूल होत नसल्याने आणि बाळ दत्तक घेण्याकरिता विलंब लागत असल्याने पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी अंबड लिंक रस्त्यावरून चार वर्षीय बालिकेचे अपहरण करणाऱ्यास सातपूर पोलिसांनी अटक केली. अपहरणामागील कारण ऐकून पोलीस यंत्रणाही चक्रावली. अपहृत बालिकेला तिच्या मूळ पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या घटनाक्रमाची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. १५ मे २०१५ रोजी सकाळी सातपूर लगतच्या पेट्रोल पंपालगत ही घटना घडली होती. नंदिनी शर्मा (४) या बालिकेला संशयितांनी पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून पळवून नेले होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सर्वत्र शोध सुरू केला. अपहृत बालिका, संशयित आणि मोटारीचा गुजरात, मुंबई पुणे येथे शोध घेण्यात आला. तथापि, कसलाही थांगपत्ता लागत नव्हता. साडेसहा महिन्यांनंतर पळवून नेलेली बालिका सातपूरजवळील धुव्रनगर येथील समृद्धी इमारतीत शिवदास पुंजा सातपुते (४२) यांच्याकडे सापडली. तसेच बालिकेला पळवून नेण्यासाठी ज्या मोटारीचा वापर झाला होता, ते वाहनही पोलिसांच्या हाती लागले. या प्रकरणाच्या चौकशीत धक्कादायक माहिती पुढे आली. संशयित दाम्पत्याला मूलबाळ होत नव्हते. बाळ दत्तक मिळावे म्हणून संबंधितांचे प्रयत्न सुरू होते. पत्नीला मुलगी हवी असल्याने या बालिकेला पळवून नेल्याची कबुली संशयिताने दिली. बालिकेला पळवून आणल्यानंतर संशयिताने पत्नीला तिला गुजरातमधील आश्रमातून दत्तक आणल्याची खोटी माहिती दिली.