इगतपुरी येथे एका २५ वर्षीय युवकासह तिघांना मागील भांडणाची कुरापत काढून रविवारी रात्री जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. इगतपुरी पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इगतपुरीतील कोकणी मोहल्ला परिसरात दीपक बोरसे राहतो. त्याचा भाऊ प्रशांत ऊर्फ लखन बोरसे याचे कुणाल हरकरे (रा. राममंदिरजवळ) याच्याशी सायंकाळी किरकोळ कारणावरून भांडण झाले. परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करून भांडण मिटवले. प्रशांत आणि दीपक घरातील गणपती विसर्जनानंतर रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास गल्लीत थांबले होते. मित्र सुरेश गुप्ता ऊर्फ बबली शेठही त्यांच्यासोबत उभा होता. संशयित कुणालने पातेल्यात रॉकेल आणून ते प्रशांत, दीपक आणि बबली शेठच्या अंगावर टाकले. तसेच पेटता आगीचा बोळा त्यांच्या अंगावर टाकून फरार झाला. तात्काळ परिसरातील नागरिकांनी आग विझवत जखमींना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या घटनेची नोंद इगतपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी संशयित कुणालला रात्री उशिरा ताब्यात घेतले.

दरम्यान, दुसऱ्या घटनेत सटाणा तालुक्यातील बिजोरसे शिवारात प्रतिभा सोमवशी (५५) यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. जायखेडा पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घोटी-सिन्नर महामार्गावर लूटमार करणाऱ्यांना अटक

नाशिक : घोटी-सिन्नर महामार्गावर वाहने थांबवून तसेच त्यांचा पाठलाग करून लूटमार करणाऱ्या चार संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

ठाणे येथील रहिवासी संजीत शेवाळे मागील रविवारी पत्नीसह स्कोडा कारने नाशिकहून ठाण्याकडे निघाले असता संशयितांनी क्रमांक नसलेली स्विफ्ट डिझायर कार शेवाळे यांच्या गाडीस आडवी लावून त्यांच्या तोंडावर तिखट स्प्रे मारून पाठीमागील सीटवरील पैशांची बॅग आणि कागदपत्रे हिसकावून नेली होती. शेवाळे यांच्या तक्रारीवरून घोटी पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल झाला.  गुन्ह्य़ाच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी केलेल्या सूचनांनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक करपे यांच्या पथकाने तपास केला. शिर्डी, नाशिक शहर आणि शिवडे परिसरातून अरुण बांगर (३२, रा. भिवंडी), विजय काळे (३६, रा. संगमनेर), विकास ऊर्फ विकी चव्हाणके (२३, ता. सिन्नर), अमोल माळी (२६, रा. सिन्नर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्हा करतेवेळी वापरलेली स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली. दरम्यान, सुमित निरभवने (रा. देवळाली) याच्यासह अन्य तीन साथीदार फरार आहेत. बांगर याच्याविरुद्ध ठाणे शहर येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta crime news
First published on: 25-09-2018 at 01:04 IST