लोकांमधील अंधश्रद्धा, असहकार्याचे धोरण आणि प्रबोधनाचे आव्हान

चारूशीला कुलकर्णी, लोकसत्ता

नाशिक : संवेदनशील असलेले मालेगाव ‘करोना’चे केंद्रबिंदू बनत आहे. प्रशासनाला या ठिकाणी काम करताना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. लोकांमधील अंधश्रद्धा, कर्मचाऱ्यांमध्ये असणारी भीती, त्यामुळे असणारे असहकार्याचे धोरण, लोकांच्या मनात आजाराविषयी असणारे गैरसमज अशी तीन पायांची र्शयत प्रशासन लंगडत पुरी करत असताना आजारावर नियंत्रण आणायचे कसे, असा प्रश्न प्रशासनासमोर आहे.

जिल्ह्य़ात लासलगांव परिसरात पहिला करोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा आरोग्य विभाग सक्रिय झाला. वेगवेगळ्या माध्यमांतून करोनाविषयी जनजागृती केली जात असताना मालेगाव शहर मात्र आजाराविषयी अनभिज्ञ राहिले. असा काही आजार आहे आणि तो आपल्याला होईल हे तेथील नागरिक मान्यच करत नसल्याने आरोग्य विभागाला लोकप्रतिनिधी, धर्मगुरू यांच्या मदतीने लोकांचे प्रबोधन करावे लागले. दुसरीकडे दोन हजार ९०० पैकी केवळ १३०० कर्मचारी सध्या कामावर असून प्रत्यक्ष हजेरी केवळ ३० टक्के लोकांची आहे. ७५० स्वच्छता कर्मचारी तर ३०३ वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ही भिस्त आहे.

करोनाचा संसर्ग पाहता अलगीकरण कक्षासाठी मालेगाव येथील मालदा परिसरातील केंद्र शासनाच्या एकत्रित गृहनिर्माण झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या इमारती वापरण्याचे ठरविले असता तेथील नागरिकांनी महापालिकेला विरोध केला.

अतिशय दर्जाहीन असलेल्या दोन इमारतींमध्ये अलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला असून त्या

ठिकाणी प्रशासनाकडून देण्यात आलेली गादी, पंखा, खाटा आदी व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे काम तेथील लोकांकडून करण्यात येत असल्याची तक्रार महापालिका उपायुक्त नितीन कापडणीस यांनी केली. नागरिकांच्या विध्वंसक वृत्तीमुळे ५० ते ६० लाख रुपये खर्च करून पुन्हा इमारतींमध्ये आवश्यक सोयी-सुविधा देण्यात आल्या. सद्य:स्थितीत या ठिकाणी अलगीकरण कक्ष सुरू झाल्याचे कापडणीस यांनी नमूद केले.

उपचारांपेक्षा या ठिकाणी प्रबोधनाचे आव्हान मोठे असल्याने प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

अवघ्या महिनाभरातील खेळ

मालेगांवमध्ये ८ एप्रिल रोजी पहिला करोनाबाधित रुग्ण आढळला. त्यानंतर वेगवेगळ्या अडचणींचा डोंगर समोर उभा राहिला. अलगीकरण कक्षास स्थानिकांचा विरोध, कर्मचाऱ्यांचे असहकार्य, करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींमध्ये आजाराविषयी असणारा गैरसमज, लोकप्रतिनिधींची बघ्याची भूमिका यामुळे वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आरोग्य सेवा बजावतो म्हणजे आम्हालाही करोना होणार, असा गैरसमज या ठिकाणी असल्याने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना स्थानिक त्रास देत आहेत. प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या एजन्सीतील कर्मचाऱ्यांना तर वसाहतीने रस्ता बंद केल्याने त्या लोकांनी आमची व्यवस्था करा अन्यथा काम बंद करतो, असा इशारा दिला. या सर्वाची व्यवस्था करत प्रत्यक्ष काम कसे करायचे, असा प्रश्न समोर आहे.

– नितीन कापडणीस (उपायुक्त, मालेगाव महापालिका)