दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळेचा गणवेश परिधान करून यावे अशी भूमिका ऐन वेळी केंद्रप्रमुखांनी घेतल्यामुळे शुक्रवारी सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये पालक आणि मनमाड केंद्र परीक्षा समितीचे शिक्षक यांच्यात मोठा वाद निर्माण झाला. पालकांनी प्रशासनाला धारेवर धरल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना परीक्षेला बसू देण्यात आल्यावर तणाव निवळला.
शुक्रवारी दहावी परीक्षेचा सहावा पेपर होता. सकाळी अकरा वाजता परीक्षा सुरू होणार होती. अर्धा ते पाऊण तास आधीच विद्यार्थी येऊ लागले. वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी गणवेश परिधान केले नसल्याचे पाहून प्रशासनाने त्यावर आक्षेप घेतला. गणवेश असल्याशिवाय परीक्षेला बसू दिले जाणार नसल्याची भूमिका प्रशासन व शिक्षकांनी घेतली. त्यामुळे ऐन परिक्षेच्या वेळी गोंधळ निर्माण झाला. अनेक विद्यार्थ्यांनी घरी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिल्यानंतर पालकांनी सेंट झेवियर्समध्ये धाव घेऊन प्रशासनाला जाब विचारला. भरारी पथकाने दोन दिवसांपूर्वी सूचना दिल्यामुळे विद्यार्थ्यांना गणवेश परिधान करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आल्याचे शिक्षकांनी नमूद केले. परीक्षेला दहा मिनिटे उरले असताना पालकांच्या आग्रहास्तव विद्यार्थ्यांना पेपरला बसू देण्यात आले. नाशिक विभागीय शिक्षण मंडळाच्या सहाय्यक प्रशासन अधिकारी ए. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंगळवारी शाळेत भेट दिली होती. त्यावेळी अनेकांनी गणवेश परिधान केले नसल्याचे पाहून केंद्रप्रमुखांना त्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सूचित करूनही पालन न झाल्यामुळे हा गोंधळ उडाला. दहावी परीक्षेला गणवेश परिधान करून यावे, असा मंडळाचा कोणताही नियम नसल्याचा दावा पालकांनी केला. परीक्षे वेळी विद्यार्थ्यांना अडविल्याने त्यांच्यावर मानसिकदृष्टय़ा परिणाम झाल्याची तक्रार पालकांनी केली.