X

नाटय़गृहाच्या भाडेवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

शुक्रवारी भाडेवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने कलामंदिराबाहेर प्रतीकात्मक नोटीस लावत आंदोलन केले.

शहराचा सांस्कृतिक मानबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाकवी कालिदास कलामंदिर नाटय़गृहाच्या भाडेवाढीवरून सांस्कृतिक क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना आता राजकीय पक्षही मैदानात उतरले आहेत. शुक्रवारी भाडेवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने कलामंदिराबाहेर प्रतीकात्मक नोटीस लावत आंदोलन केले.

कलामंदिराची पूर्वीची दयनीय अवस्था बघता नूतनीकरण करणे आवश्यक होते, परंतु नाटय़गृहाला रंगरंगोटी, आसन व्यवस्था सोडून अत्याधुनिक अशी एकही व्यवस्था उपलब्ध झालेली नाही. व्यवस्थेच्या तुलनेत नाटय़गृहाचे भाडे मोठय़ा प्रमाणात वाढविले. यामुळे कलावंतांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून राष्ट्रवादीने कलामंदिराबाहेर उपहासात्मक नोटीस लावत आंदोलन केले.

‘ही खासगी मिळकत असून त्यात प्रवेश करावयाचा झाल्यास प्रचंड पैसे खर्च करावे लागतात. कला रसिकता, भावनेला येथे थारा नाही,’ असे उपरोधिकपणे फलकावर लिहिले आहे. ही दरवाढ प्रेक्षकांना परवडणार नाही. इतर नाटय़गृहे कमी खर्चात उपलब्ध असल्याने कलावंत तिकडे वळतील आणि कालिदास कलामंदिर दुर्लक्षित होईल, असे आंदोलकांनी म्हटले आहे.

भाडेवाढीमुळे कलावंत नाटय़गृहाकडे फिरकणार नाहीत. ते वापराविना पडून राहील आणि महापालिकेने नूतनीकरणासाठी केलेल्या खर्चावर पाणी फिरेल, अशी भीती प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी व्यक्त केली.

भाडेवाढ ही केवळ ठेकेदारांच्या हिताचीच आहे. नूतनीकरणावर झालेला अवाढव्य खर्च आणि न मिळालेल्या अत्याधुनिक सोयी-सुविधा याविषयी दाट संशय असल्याने या संपूर्ण खर्चाचे परीक्षण करावे, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. या वेळी सामाजिक न्याय प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नगरसेवक गजानन शेलार आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.