विभागात करोनाबाधितांची संख्या २२०० चा टप्पा गाठण्याच्या मार्गावर असून त्यातील १२२५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. १७१ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ७७३ रुग्ण उपचार घेत आहेत. रविवारी सकाळी नाशिकमध्ये करोनाचे पुन्हा १३ रुग्ण आढळले. शहरी भागात रुग्णसंख्येत वाढ होण्यामागे टाळेबंदीच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष कारक ठरल्याचे चित्र आहे.

विभागात रविवारी दुपापर्यंत २१६९ रुग्ण आढळले असून सर्वाधिक ११९९ रुग्ण नाशिक जिल्ह्यातील आहेत. सकाळी प्राप्त झालेल्या ४४ अहवालात १३ जणांचे अहवाल सकारात्मक, तर ३० जणांचे अहवाल नकारात्मक आले. नव्याने आढळलेले रुग्ण अधिक्याने नाशिक शहरातील आहेत. लेखानगर येथील दोन युवक आणि एक महिला, मखमलाबाद रस्त्यावरील तीन, जुने नाशिक भागातील वृध्दा आणि खुटवडनगर येथील महिलेचा अहवाल सकारात्मक आला. यामुळे शहरातील रुग्णांची आकडेवारी २०० चा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. त्याआधी शनिवारी रात्री दिंडोरी रस्त्यावरील स्नेहनगर भागातील ७२ वर्षांच्या वृध्दाचा अहवाल सकारात्मक आला. सटाणा येथील महिला आणि पुरूष, मालेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस, सिन्नरच्या दापूर येथील व्यक्तीला करोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे उघड झाले. समाधानाची बाब म्हणजे, नाशिक शहरातील ४६ संशयितांचे अहवाल नकारात्मक आले. विभागातील करोनाची सद्यस्थिती आरोग्य उपसंचालक डॉ. एम. आर. पटणशेट्टी यांनी मांडली.

नाशिकमध्ये सध्या ३२२ रुग्ण उपचार घेत आहेत. तर करोनामुक्त होऊन ८१४ जण घरी परतले. नाशिक खालोखाल जळगावचा क्रमांक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६७९ रुग्ण आढळले. यातील ३४४ जण उपचार घेत असून २५८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. धुळे जिल्ह्यात १५६ रुग्ण आढळले असून त्यापैकी ७१ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. उपचारानंतर ६७ रुग्णांना घरी सोडण्यात आले. गुजरातलगत असलेल्या नंदुरबारमध्ये ३२ रुग्ण असून सध्या १० रुग्ण उपचार घेत आहेत. तर १९ जणांना घरी सोडण्यात आले. नगरमध्ये रुग्णांची आकडेवारी १०३ वर गेली असून सध्या २६ रुग्ण उपचार घेत आहेत. ६७ रुग्णांवर उपचार करण्यात आले.

नाशिकची रुग्णसंख्या वाढण्यामागे मालेगावमध्ये करोनाचा कहर कारणीभूत ठरला आहे. नाशिकच्या एकूण रुग्णांपैकी ७६६ जण मालेगाव शहरातील आहेत. मालेगावमध्ये सध्या ११३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. करोनाचा आलेख उंचावत असला तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. विभागात ८० टक्के रुग्ण हे लक्षणे नसणारे अथवा सौम्य लक्षणे असणारे आहेत. अशा रुग्णांना रुग्णालयातून सोडण्याच्या कार्यपध्दतीत बदल झाल्यामुळे चार दिवस आधीच म्हणजे १० दिवसांत उपचार घेऊन रुग्ण घरी जातात. अखेरच्या तीन दिवसात ताप, सर्दी, खोकला यांची तपासणी करून रुग्णांना घरी सोडले जाते. यामुळे घरी जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. नाशिक शहरात सहा ते सात दिवसांत करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

जळगावमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक; एकाच कुटुंबातील १२ जण बाधित

विभागात करोनाच्या प्रादुर्भावात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या जळगावमध्ये रविवारी दुपापर्यंत ३७ नवीन रूग्ण आढळल्याने रूग्ण संख्या ७३८ झाली आहे. त्यातील ७७ जणांचा मृत्यू झाला आहे. जळगाव शहरात नवल कॉलनीतील महापालिका कर्मचाऱ्याच्या घरातील १२ जण बाधित असून जिल्ह्याची रूग्णसंख्या रविवारी दुपापर्यंत ७३८ वर पोहचली आहे. शहराची रुग्णसंख्या १५६ असून तालुक्यात १७३ रुग्ण आहेत. जिल्हा कोविड रूग्णालयाने जिल्हा प्रशासनाला पाठविलेल्या दुपारी पाठविलेल्या अहवालात एकूण ४५ रूग्ण सकारात्मक आढळले असून त्यातील आठ जण हे आधीचे सकारात्मक रूग्ण आहेत. रुग्णसंख्येत जिल्ह्यात जळगाव तालुका प्रथम क्रमांकावर आहे. त्याखालोखाल भुसावळ १६०, अमळनेर १२८ यांचा नंबर लागतो. चार दिवसात जिल्ह्यात २११ रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिकरुग्णसंख्या असणाऱ्या नाशिक जिल्ह्यात ६३, धुळे जिल्ह्यात १८, नंदुरबारमध्ये तीन तर अहमदनगरमध्ये १० असा एकूण १७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.