• भुयारी मार्गात स्वच्छ प्रकाश व्यवस्थेत चालढकल
  • सिग्नल यंत्रणेवरूनही टोलवाटोलवी

नाशिक : जवळपास १७ रस्ते एकत्र येणाऱ्या द्वारका चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहर पोलिसांनी अनेक निर्णय घेऊन प्रयत्न चालविले. मात्र, त्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेकडून आवश्यक ते सहकार्य मिळत नसल्याने कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे.

भुयारी मार्गात स्वच्छ प्रकाश व्यवस्था, द्वारका चौकात सिग्नल व्यवस्था कार्यान्वित करण्यास संबंधितांकडून चालढकल सुरू आहे. भुयारी मार्गात सध्या अंबर दिव्यांची मंद प्रकाश व्यवस्था आहे. शुभ्र प्रकाश व्यवस्था झाल्यास संभाव्य गैरप्रकार आपसूक रोखले जातील. भुयारी मार्गाचा पादचारी वापरही करतील. सिग्नल यंत्रणेवरून महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका परस्परांवर जबाबदारी ढकलत आहेत. इतकेच नव्हे तर, उड्डाण पुलाखाली बसविलेले दिवे बंद असल्याने परिसरातील समांतर रस्ते रात्री अंधारातच राहतात. चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे, उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी आणि सहायक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक निर्णय घेण्यात आले. त्यांच्या अमलबजावणीस १८ दिवसांचा कालावधी झाला        आहे. सकाळी आठ ते रात्री १० या कालावधीत शहरात अवजड वाहने, खासगी प्रवासी वाहनांना प्रतिबंध करण्यात आला. उड्डाण पुलावरून अवजड वाहनांना उतरण्यास बंदी घातली गेली. समांतर रस्त्यावरील वाहतूक एकेरी झाली. इतर शहरांतून येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आले. यामुळे द्वारका चौकातील परिस्थिती झपाटय़ाने बदलली असली तरी सिग्नल यंत्रणा, भुयारी मार्गात स्वच्छ्र प्रकाश व्यवस्था असे उपाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिकेच्या असहकार्यामुळे प्रत्यक्षात आलेले नाही. या संदर्भात शहर पोलीस दोन्ही यंत्रणांकडे पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा करीत आहे.

भीतीमुळे भुयारी मार्गाचा वापर करणे अनेकजण टाळतात. या मार्गाचा वापर वाढावा, यासाठी पोलिसांना पादचाऱ्यांना शिस्तीचे धडे द्यावे लागत आहे.  ध्वनिक्षेपकावरून वारंवार आवाहन केले जाते. सायंकाळनंतर म्हणजे रात्री भुयारी मार्गाचा वापर करणे पादचारी अधिक्याने टाळतात. या ठिकाणी असलेल्या मंद स्वरुपाचा प्रकाश ऐवजी स्वच्छ प्रकाश व्यवस्था झाल्यास या भुयारी मार्गाचा वापर होईल. त्यामुळे टवाळखोर तसेच तत्सम घटकांना चाप बसेल. यासाठी पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणशी अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र, त्यास प्रतिसाद मिळाला नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. तीच स्थिती द्वारका चौकातील सिग्नल व्यवस्था कार्यान्वित करण्यासंदर्भात आहे. काही वर्षांपूर्वी या चौकात सिग्नल व्यवस्था अस्तित्वात होती. अवजड आणि प्रवासी वाहनांच्या गर्दीमुळे ती अयशस्वी ठरली. सध्याच्या उपाय योजनांमुळे अवजड, प्रवासी वाहनांची वर्दळ संपुष्टात आली आहे. त्यामुळे सिग्नल व्यवस्था उपयोगी ठरेल. त्याची जबाबदारी महापालिका-राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एकमेकांवर ढकलत आहेत. उभयतांच्या असहकार्यामुळे द्वारका चौकातील कोंडीवर कायमस्वरुपी मार्ग काढताना पोलिसांची दमछाक होत आहे.

   एसटी महामंडळही उदासीन

द्वारका चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी चौकालगतचे दोन बस थांबे १०० मीटरपासून दूर अन्यत्र हलविण्यात आले. धुळे, पुणे, नगर आदी भागात ये-जा करणाऱ्या एसटी बसच्या नवीन थांब्यांवर फलक लावावेत, यासाठी पोलीस पाठपुरावा करीत आहेत. हे फलक लावले जात नसल्याने चालक द्वारका चौक परिसरात एसटी कुठेही उभ्या करून प्रवासी उतरवतात. बाहेरगावहून येणाऱ्या चालकांना नव्या थांब्याची कल्पना नसते. फलक लावल्यास थांब्यावर बस थांबतील. प्रवाशांना ये-जा करणे सुकर होईल. परंतु, महामंडळ फलक उभारणीचे औदार्य दाखवत नसल्याची शहर पोलिसांची तक्रार आहे.