सोमवारी लाल कांद्याचा दर १५० रुपयांनी कमी

मनमाड : मागील आठवड्यात कांदा दर बऱ्यापैकी वाढल्याने समाधानात असलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी मात्र दर घसरणीचा अनुभव घ्यावा लागला. मनमाड  कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत सोमवारी लाल कांद्याच्या दरात १५० रूपयांनी घसरण झाली. शनिवारी लाल कांदा सरासरी चार हजार रूपये तर सफेद कांदा २१५० रूपये क्विंटल दराने विकला गेला होता.

जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना कधी आशा तर कधी निराशा वाटावी, असे दरात चढ-उतार होत आहेत. कांदा उत्पादकांना असा अनुभव कायमच येत असतो. काही महिन्यांपूर्वी कांदा दरात चांगलीच वाढ झाली होती. त्यामुळे शेतकरी समाधानात असतांना निर्यात बंदी करण्यात आली. त्यामुळे कांद्याचे दर पुन्हा कोसळले. शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फे रले गेले. त्यानंतर कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांसह इतरही राजकीय पक्षांनी आंदोलने केली. शेतकऱ्यांचा दबाव अधिकच वाढू लागल्यानंतर केंद्राने निर्यातबंदी उठविली. त्यामुळे दरात सुधारणा आणि दर कमी होणे असे चक्र च सुरू झाले आहे. जिल्ह्यात सटाणा,  देवळा या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड झाली  आहे. हे पीक बाजारात एकाचवेळी येण्याची शक्यता असल्याने पुन्हा  दर कोसळण्याची भीती व्यक्त  होत असतांनाच जिल्ह्याच्या बहुतेक भागात गुरुवारी गारपिटीसह झालेल्या वादळी पावसाने सुमारे १० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक ३३०० हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे.

या नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी धडपडणाऱ्या  कांदा उत्पादकांना कांदा दरातील चढ-उतार अधिकच त्रासदायक ठरत आहे. सोमवारी मनमाड बाजार आवारात  कांद्याची ४७० ट्रॅक्टर इतकी आवक  सोमवारी मनमाड बाजार आवारात कांद्याची ४७० ट्रॅक्टर इतकी आवक झाली. लाल कांद्याला १५०० ते ४१०२ सरासरी ३८५० रूपये क्विंटल तर सफेद कांद्याला १९०० ते २४०० सरासरी २२०० रूपये क्विंटल असा भाव मिळाला. मक्याची ६० नग इतकी आवक झाली. १२५० ते २४५० सरासरी १३३० रूपये क्विंटल असे भाव होते. तर धान्य आणि कडधान्याच्या भावात चढ-उतार दिसून आली. यात बाजरी  सरासरी ११३१, गहू १६७६, हरभरा ४२७१ रूपये, तुर ६३८० रूपये, ठ ६२०१ रूपये तर मुगाला सरासरी ४००० हजार रूपये असा भाव होता.