नाशिक : शहर, परिसरात मोठय़ा प्रमाणावर करोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णसंख्येने दोन हजाराचा टप्पा ओलांडला आहे. मृतांची संख्या देखील १०४ हून अधिक झाली आहे. करोना नियंत्रणासाठी शासनाने आतापर्यंत केवळ ५० लाखाचा निधी दिला आहे. महापालिका स्वखर्चातून करोनाचा प्रतिकार करत आहे.

करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी अधिकच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी लागणारा खर्च महाराष्ट्र शासनाने नाशिक महानगरपालिकेस द्यावा, अशी मागणी भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांकडे केली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात ५०० खाटा वाढविणे आणि शहराची गरज लक्षात घेता ५० व्हेंटिलेटरची व्यवस्था तातडीने करणे गरजेचे आहे. करोनाबाधितांची तपासणी करण्यासाठी कोविड केंद्रांची संख्या वाढवावी लागेल. याशिवाय इतरही उपाय करण्याची निकड असल्याकडे आ. फरांदे यांनी लक्ष वेधले. सद्यस्थितीत शहरात केवळ २०० ते २५० संशयितांच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. रुग्णसंख्या वाढत असल्याने दररोज किमान एक हजार संशयितांची तपासणी आवश्यक आहे. या उपाययोजनांसाठी महापालिकेला आर्थिक मदतीची निकड असून शासनाने ती तातडीने द्यावी, असे आमदार फरांदे यांनी सांगितले.

महाविकास आघाडीला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न

निधीच्या मुद्यावरून महापालिकेतील सत्ताधारी भाजपने राज्यातील महाविकास आघाडी सरकारला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न चालविला आहे. मुंबई, पुणे आणि इतर शहरांप्रमाणे नाशिकमध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. शासनाकडून पुरेसा निधी दिला जात नसल्याचा मुद्दा या माध्यमातून भाजपने समोर आणला. शहरात भाजपचे तीन आमदार असून महापालिका याच पक्षाच्या ताब्यात आहे. राज्यात सत्तान्तर झाल्यानंतर महापालिकेतील राजकारणात बदल झाले. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष भाजपला वारंवार अडचणीत आणत आहेत. निधीच्या मुद्यावरून भाजप राज्यातील सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरण्याच्या तयारीत आहे.