गुजरातला पाणी देण्यावरून प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

महाराष्ट्राचे पाणी गुजरातला दिले जाते, पण तरीही पंतप्रधानांची मर्जी सांभाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीही करत नाही. नरेंद्र मोदींना गुजरातशिवाय इतर कोणतेही राज्य दिसत नाही. ते देशाचे कमी, गुजरातचे अधिक पंतप्रधान आहेत, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी लगावला. काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू असून धर्माचे राजकारण करणाऱ्यांपासून आपण सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बापू बर्डे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सकाळी येथील महर्षी भगवान वाल्मीकी स्टेडियममध्ये आंबेडकर यांची सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.

भाजपचे सरकार चोर आणि डाकूंचे असून ज्या नोटांवर सरकारची मालकी नाही, पंतप्रधानांची नव्हे तर गव्हर्नरांची स्वाक्षरी असते त्या नोटा पंतप्रधानांनी कशा रद्द केल्या? असा सवाल करून आंबेडकर म्हणाले, ही निवडणूक आणि आपले मत याची इतिहासात नोंद केली जाईल. आपल्या मताचे मूल्य प्रत्येकाने ओळखावे. दिंडोरी मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बापू बर्डे हे गरीब असून मतदारसंघही मोठा आहे. सर्वांपर्यंत ते पोहोचतीलच असे शक्य नाही. त्यामुळे उमेदवार आमच्यापर्यंत आला नाही, असा कांगावा कोणी करू नये.

नियोजनाअभावी राज्याच्या विविध भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून मतदारांनी आपल्या प्रश्नांना महत्त्व देऊन तसे धोरण ठरवले पाहिजे. त्यासाठी जात, धर्मविरहित मतदान करण्याचे आवाहनही आंबेडकर यांनी केले.

मतदारसंघात सर्वत्र पाणीप्रश्न गंभीर झाला असून मतदारसंघातील प्रश्न आणि समस्या तडीस लावण्यासाठी आपल्याला संधी देण्याचे आवाहन उमेदवार बर्डे यांनी केले.

पाणी प्रश्न गंभीर

दिंडोरी मतदारसंघ अविकसित राहिला असून २५ ते ३० वर्षांपासून मनमाड शहराचा पाणीप्रश्न गंभीर आहे. मनमाडपासून जवळच असलेल्या दुगाव येथे कालव्याला जोडून दुसरा कालवा काढला तर मनमाडला पूर्ण क्षमतेने आणि नैसर्गिक उताराने पाणी मिळू शकते. पण आजपर्यंत हे काम कोणी केले नाही. जवळच्या येवला शहराचा विकास झाला. नांदगाव मात्र अविकसित राहिले. येथील पाण्याची समस्या सुटू शकली नाही. कारण राजकीय नेत्यांना पाण्यापेक्षा रस्ते बांधणे अधिक महत्त्वाचे वाटले. मनमाडला भरपूर पाणी मिळू शकते, पण त्याचे नियोजन करण्याची गरज असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.