X

विविध मार्गानी जनतेकडून पैसे उकळण्याचा ‘भाजप’चा डाव

राफेल खरेदीतील कथित घोटाळ्याविरोधात काँग्रेसच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

काँग्रेस मोर्चात पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

सरकारकडे सद्य:स्थितीत सत्ता चालविण्यासाठी पैसे नाहीत. त्यांचा नोटाबंदी, ‘जीएसटी’चा प्रयोग फसल्यानेच आता इंधन दरवाढ, राफेल घोटाळा किंवा अन्य माध्यमांतून सर्वसामान्य जनतेकडून पैसे उकळले जात आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. राफेल खरेदीतील कथित घोटाळ्याविरोधात काँग्रेसच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्या वेळी चव्हाण बोलत होते.

केंद्रातील ‘भाजप’ सरकारने राफेल विमान खरेदीत मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार केला असून विमान खरेदीची संख्या कमी करीत खरेदी किंमत तीन पटीने वाढविली आहे. ‘एचएएल’कडून हे काम काढून घेतले, याची माहिती सर्वाना व्हावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे सांगून चव्हाण म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाच्या किमती कमालीच्या घसरत असताना देशात विशेषत महाराष्ट्रात कर लादत इंधनाच्या किमती चढय़ा ठेवल्या आहेत. देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असून रखडलेल्या विकासकामात सर्वसामान्य भरडले जात आहेत. दरम्यान, शिष्टमंडळाने इंधन दरवाढ, राफेल घोटाळा, शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री शोभा बच्छाव आदी उपस्थित होते.

गर्दी जमविण्यासाठी आटापिटा

मोर्चात गर्दी दिसावी यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आटापिटा करावा लागला. त्यामुळे मोर्चा नियोजित वेळेपेक्षा सुमारे दीड तासाने उशिरा काढूनही फारशी गर्दी जमलीच नाही. काँग्रेसच्या पक्ष कार्यालयापासून दुपारी निघालेल्या मोर्चात अग्रभागी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि इतर पदाधिकारी होते.मोर्चा अशोक स्तंभ, रविवार कारंजा, शालिमारमार्गे शिवाजी रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ थांबला.

अशी ही पक्षनिष्ठा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोर्चाच्या समारोपप्रसंगी पृथ्वीराज चव्हाण यांचे भाषण सुरू  असताना काही लोकांकडून पक्षाची खिल्ली उडविली जात होती. हा प्रकार महिला कार्यकर्त्यांना सहन झाला नाही. पक्षाविषयी अपशब्द काढणाऱ्या व्यक्तीला त्यांनी चारचौघात सुनावले.

वाहतुकीचा खोळंबा

मोर्चात सहभागी होणारे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या वाहनांमुळे महात्मा गांधी रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. वर्दळीच्या रस्त्यालगत पक्षाच्या वतीने गणेशोत्सवासाठी मंडप टाकण्यात आलेला असल्याने कार्यकर्त्यांच्या हालचालींवर नियंत्रण आले.