नाशिक : अयोध्येत एकीकडे श्रीराम मंदिराचा भव्यदिव्य भूमिपूजन सोहळा होत असताना बुधवारी यानिमित्त नाशिकमध्येही उत्साहाला उधाण आले होते. श्रीरामरक्षा सामूहिक अनुष्ठान, गोदापूजन, प्रसाद, पेढे वाटप असे विविध कार्यक्रम झाले. दुसरीकडे, करोनाचा वाढता संसर्ग तसेच धार्मिक तेढ वाढू नये, यासाठी शहर परिसरातील कार्यकर्ते, साधुमहंत यांना मंगळवारी कार्यक्रम घेऊ नये म्हणून नोटीस बजावण्यात आली होती. तरीही शहरात विविध कार्यक्रम झाले.

पंचवटी येथील श्रीकाळाराम मंदिर मंगळवारपासूनच सजले होते. मंदिराच्या आवारात राम मंदिराची प्रतिकृती असलेली रांगोळी रेखाटण्यात आली. भजन झाले. पुरोहित संघासह अन्य काही संस्थांच्या वतीने गोदाकाठावरील रामकुंड येथे गंगा गोदावरीचे पूजन आणि महाआरती करण्यात आली. तसेच गंगाघाट परिसरातील श्रीराम स्तंभाची पूजा करून रामरक्षा पठण झाले. महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

महाआरतीला खा. हेमंत गोडसे, आ. राहुल ढिकले,आ. देवयानी फरांदे,आ. सीमा हिरे, स्थायी समिती सभापती गणेश गिते,भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, शिवसेना महानगर प्रमुख महेश बडवे आदी उपस्थित होते. गंगा गोदावरीच्या आरतीनंतर रामकुंड परिसरात असलेल्या श्रीराम स्तंभाची विधिवत पूजा करून या ठिकाणी रामरक्षा आणि हनुमान चालिसा पठण करण्यात आले. काळाराम मंदिराबाहेरील कार्यक्रमात माजी मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती होती.

पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गंगाघाट तसेच काळाराम मंदिराकडे येणारे सर्व रस्ते दुभाजक लावत बंद करण्यात आले होते. मंगळवारी पूर्वसंध्येला कार्यकर्त्यांना नोटिसा दिल्यामुळे बुधवारी अनेक साधू, महंत कार्यक्रमास उपस्थित राहिले नाहीत.

शहरात ठिकठिकाणी भगवे झेंडे, गुढय़ा उभारण्यात आल्या. राम आणि हनुमान मंदिरासह अन्य मंदिरांमध्ये आणि घरांपुढे रांगोळ्या काढण्यात आल्या. गंगापूर रोडवरील नसती उठाठेव मित्रमंडळाच्या वतीने नगरसेवक योगेश हिरे यांनी सपत्नीक श्रीराम प्रतिमेचे पूजन केले.

रामाची आरती करून पेढे वाढण्यात आले. कार्यक्रमाला आलेल्या नागरिकांना ‘श्रीराम’ लिहिलेल्या भगव्या मुखपट्टय़ांचे वितरण करण्यात आले. त्र्यंबकेश्वर येथेही कारसेवकांच्या वतीने कुशावर्त तीर्थावर घंटानाद करण्यात आला.

भाजपतर्फे कारसेवकांचे पाद्यपूजन

भाजप पंचवटी आणि तपोवन मंडळाच्या वतीने अयोध्येत १९९० आणि ९२ साली गेलेल्या कारसेवकांचे बुधवारी श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी कारंजा येथे पाद्यपूजन करून सत्कार करण्यात आला. यामध्ये इनामदार, आबासाहेब वडगणे, परशराम दळवी, उत्तमराव उगले, संजय चव्हाण, कृष्णा घरोटे, सतीश शुक्ल, श्रीकांत जोशी, लता डोंगरे, सुजित नेवे, वैजयंती सिन्नरकर, श्रीपाद भट यांचा समावेश होता. भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, आ. देवयानी फरांदे, अ‍ॅड. राहुल ढिकले, सीमा हिरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी विजय साने, पवन भगूरकर, गणेश गिते आदी उपस्थित होते. या प्रसंगी प्रभू श्रीरामाची भव्य प्रतिमा उभारून रांगोळी काढण्यात आली. तसेच नागरिकांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.