नाशिकची जबाबदारी महापालिका आयुक्तांकडे

नाशिक : करोना संसर्गाची लढाई ही दीर्घकाळ चालणारी आहे. यात शासन, प्रशासनासमोर संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी उपचार आणि या स्थितीत दैनंदिन व्यवहार सुरू करीत अर्थचक्र सुरू ठेवणे ही दोन आव्हाने आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासह मालेगावमधील परिस्थितीवर जिल्हाधिकारी, नाशिक शहरावर महापालिका आयुक्त आणि येवल्यासह ग्रामीण भागावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष केंद्रित करावे, अशी सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. सुरूवातीला जिल्ह्यात एकही करोनाचा रुग्ण नव्हता, आज तो सर्वदूर पसरला आहे. शहरी भागातील संसर्ग ग्रामीण भागातही जाऊन पोहचला आहे. या परिस्थितीत जिल्हास्तरीय यंत्रणा आणि तालुकास्तरीय यंत्रणांनी आपसातील समन्वय बळकट करणे आवश्यक आहे. प्रलंबित नमुना अहवाल लवकरात लवकर निकाली काढून सकारात्मक रुग्णांवर तात्काळ इलाज कसे करता येतील, याकडे लक्ष द्यावे लागेल. सुमारे एक हजार अहवाल हे स्थानिक प्रयोगशाला, आंध्र प्रदेशातील संच पुरवठादार, जे.जे. रूग्णालयात नव्याने कार्यान्वित होणाऱ्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून तत्काळ कसे प्राप्त करून घेता येतील याचे नियोजन करावे, असे भुजबळ यांनी सूचित केले. जे.जे.तील प्रयोगशाळेत दिवसाला ३०० नमुन्यांच्या तपासणीची क्षमता राखीव ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रलंबित अहवालांची संख्या दिवसेंदिवस कमी होईल. करोना व्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार घेण्यासाठी आलेल्या रूग्णांचा नमुना घेतल्यानंतर त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात यावी. इतर आजारांचे रुग्ण हे करोना संशयित नाहीत, ज्यांना घरीच विलगीकरण, अलगीकरण शक्य आहे, त्यांचा आणि ज्यांना शक्य नाही त्यांचा सारासार विचार करून निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सूचित केले.

दुकानांच्या वेळेचा पुनर्विचार

येवल्याची वाढती रूग्णसंख्या चिंतेचा विषय असून तेथे स्वतंत्रपणे एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याची घटना व्यवस्थापक अथवा समन्वयक म्हणून नेमणूक करावी. ग्रामीण भागात संसर्ग जास्त पसरणार नाही यासाठी काळजी घेतली जावी. दुकाने उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळांबाबत जिल्ह्यात एकसारखेपणा, सुसुत्रता कशी राहील, याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश भुजबळ यांनी दिले. जेवढय़ा अधिक संख्येने दुकाने उघडतील तेवढी कमी गर्दी, जेवढा वेळ जास्त दुकाने सुरू राहतील तेवढी गर्दी कमी याबाबत सारासार विचार करून सर्व यंत्रणांनी सर्व आपआपसात संमतीनेच निर्णय घ्यावा.

मजुरांना मदत करा

मुंबई, ठाणे येथून मजुरांचे लोंढे मोठय़ा प्रमाणावर नाशिकच्या दिशेने येत आहेत, महिला, मुली, लहान बालके त्यांच्यासोबत आहेत. ते जात असतील तर त्यांना जाऊ द्यावे, ज्यांना निवारा गृहात रहायचे आहे, त्यांना थांबू द्यावे. जाणाऱ्यांसाठी अशासकीय संस्थांच्या माध्यमातून खाण्यापिण्याची व्यवस्था करावी. ते या देशाचे नागरिक आहेत, त्यांच्याशी मानवतेने प्रशासन, जनतेने व्यवहार करावेत, असे आवाहन भुजबळ यांनी केले.