News Flash

शाही मार्गावरून मिरवणूक काढल्याने साधूसंतप्त

आत्मा मालिक ध्यानपीठाने शनिवारी मिरवणुकीचे आयोजन केले होते.

भाविकांवर तलवारी उगारल्या
आखाडय़ांची परवानगी न घेता शाही मार्गावर मिरवणूक काढल्यामुळे शनिवारी संतप्त झालेले साधू-महंत विश्वात्मक जंगली महाराज ट्रस्टच्या (आत्मा मालिक ध्यानपीठ) मिरवणुकीत सहभागी झालेले लेझिम पथकातील विद्यार्थी, महिला व भाविकांच्या अंगावर तलवारी व लाठय़ा-काठय़ा घेऊन धावून गेले. अचानक घडलेल्या या प्रकाराने साधुग्राममध्ये गदारोळ उडाला. साधूंनी काही रथांची तोडफोड केली. आखाडय़ांच्या परवानगीशिवाय कोणालाही या मार्गावर मिरवणूक काढता येणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतल्याने हतबल पोलिसांना ही मिरवणूक अन्य मार्गाने वळविणे क्रमप्राप्त ठरले.
आत्मा मालिक ध्यानपीठाने शनिवारी मिरवणुकीचे आयोजन केले होते. त्यासाठी पोलीस यंत्रणेची रीतसर परवानगी काढण्यात आली. औरंगाबाद रस्त्यावरून दुपारी तीनला ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली. अग्रभागी स्केटिंग खेळणारी मुले, लेझिम पथक आणि महिला मार्गक्रमण करत होत्या. सजविलेल्या रथासोबत हजारो भाविक सहभागी झाले होते. साधुग्राममधील शाही मार्गावर मिरवणूक साधू-महंतांनी रोखली. वैष्णवपंथीय आखाडय़ांची परवानगी न घेता मिरवणूक कशी काढली, असा प्रश्न करत ते तलवारी, लाठय़ा-काठय़ा घेऊन भाविकांच्या मागे धावले. यामुळे भयभीत झालेली बालके व महिलांची धावपळ उडाली. सजविलेल्या रथांवर साधूंनी हल्ला चढविला. त्यात एक भाविक जखमी झाला. लोखंडी जाळ्या रस्त्यात आडव्या लावत साधूंनी मार्ग बंद केला. दरम्यानच्या काळात पोलीस फौजफाटा दाखल झाला. मात्र मिरवणुकीला या मार्गावरून जाऊ दिले जाणार नसल्याचे साधू-महंतांनी स्पष्ट केले. शस्त्र घेऊन रस्त्यावर उतरलेल्या शेकडो साधूंसमोर यंत्रणाही निष्प्रभ ठरली. अखेर मिरवणूक माघारी वळविण्यात येऊन अन्य मार्गाने ती नेण्यात आली. या घटनेनंतर अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अनी आखाडय़ाने पोलीस आयुक्तांना निवेदन दिले. त्यात वैष्णवपंथीय तीन आखाडय़ांच्या परवानगीशिवाय साधुग्राम परिसरात शोभायात्रा, गंगा पूजन व स्नान आदींना प्रतिबंध करावा, या मागणीचा अंतर्भाव आहे. दुसरीकडे आत्मा मालिक ध्यानपीठाने शस्त्र उगारणाऱ्या साधू-महंतांवर टीकास्त्र सोडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2015 11:12 am

Web Title: sadhus are aggressive due to use shahi oad
Next Stories
1 पोलिसांच्या कार्यपध्दतीविषयी बहुतांश भाविक समाधानी
2 शाही पर्वणीत भाविकांच्या सुरक्षिततेसाठीच कडेकोट बंदोबस्त
3 ‘महाराष्ट्र पोलिसांकडून कस्पटासमान वागणूक’ शंकराचार्याचा आरोप
Just Now!
X