मोसम खोऱ्यात वादळी वाऱ्यासह गारपिटी; कांदा पिकाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसानखास

अवकाळी पाऊस आणि गारा पडण्याचे सत्र सलग तिसऱ्या दिवशीही सुरू असून मंगळवारी मोसम खोऱ्यातील ताहाराबाद, सोमपूर, दसवेलसह आसपासच्या परिसरात वादळी वाऱ्यासह तासभर अवकाळी पावसाने झोडपले. काही भागात गाराही पडल्याने कांद्यासह अन्य पिके आडवी झाली. अवकाळी पावसाचा फटका डाळिंबाला बसणार असून तेल्याचा प्रार्दुभाव वाढणार असल्याची धास्ती व्यक्त केली जात आहे. पावसाचा जोर इतका होता की, तासाभरात रस्ते व नाल्यांमधून पाणी वाहू लागले.

जिल्ह्यातील हवामानात मागील चार ते पाच दिवसांत अचानक बदल झाले. रविवारी नाशिक शहर व आसपासच्या भागात बेमोसमी पाऊस कोसळला होता. त्यानंतर मालेगावच्या आसपास गारांसह बेमोसमी पाऊस झाला. तिसरा दिवसही त्यास अपवाद ठरला नाही. सटाणा तालुक्यातील अनेक भागांत बेमोसमी पावसाने शेतीचे नुकसान केले. सकाळपासून वातावरणात उकाडा जाणवत होता.

दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. मोसम खोऱ्यात त्याचा अधिक प्रभाव होता. ताहाराबाद, मुल्हेर, आसखेडा, पिंपळकोठे, सोमपूर, दसवेलसह द्यानेपर्यंतच्या पट्टय़ात तासभर मुसळधार पाऊस झाला. या पावसाने ठिकठिकाणी रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहू लागले. पावसाळ्यानंतर कोरडेठाक झालेल्या नदी-नाल्यांमधून पाणी वाहत असल्याचे पहावयास मिळाले. याच भागातील मांगीतुंगी येथे जैन धर्मियांचा भगवान ऋषभदेव मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा आणि महामस्तकाभिषेक सोहळा सुरू आहे. यासाठी परिसरातील रस्त्यांवर उभारलेल्या स्वागत कमानी वादळाने जमीनदोस्त केल्या. धार्मिक सोहळ्यासाठी उभारलेल्या भव्य मंडपात पावसाचे पाणी शिरल्याने भाविकांची तारांबळ उडाली. हे पाणी बाहेर काढण्याचे काम स्वयंसेवकांनी लगेच हाती घेतले.

गारपिटीचा फटका ताहाराबाद व ढोलबारे परिसरात बसला. शेतात उभी असणारी कांदा पात आडवी झाली. अन्य पिकांनाही त्याचा फटका बसल्याचे सांगण्यात आले. पावसाने डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती उत्पादकांमध्ये आहे. अनेक भागांत आंब्याच्या झाडावरील मोहोर गळला. वीजभट्टीचेही नुकसान झाले. करंजाड येथे घराचे पत्रे उडून गेले. ताहाराबाद-दहिवेल रस्त्यावर पाणी आल्याने मार्ग काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागली. सलग तीन दिवस सुरू असलेल्या बेमोसमी पावसाने गत वर्षीच्या घटनाक्रमांना उजाळा दिला आहे. हातातोंडाशी आलेले पीक गेल्या वेळी निसर्गाने हिरावून नेले होते. हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे कोटय़वधींचे नुकसान झाले.

त्या संकटात कोलमडलेला शेतकरी अद्याप उभा राहिला नसताना यंदा पुन्हा या संकटाने डोके वर काढल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. सध्या द्राक्ष व डाळिंबाची काढणी सुरू आहे. या स्थितीत गारपीट अथवा पाऊस झाल्यास सर्व काही होत्याचे नव्हते होण्याची धास्ती वर्तवली जात आहे. सलग तीन वर्षे राज्यात गारपिटीचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. यंदाही फेब्रुवारी महिन्यात पुनरावृत्ती निसर्गाने केली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

नुकसानग्रस्तांना मदत जाहीर

२७ फेब्रुवारी ते १ मार्च २०१६ या काळात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. या काळात मालेगाव शहरात अंगावर झाड पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर ग्रामीण भागात एका बैलाचा मृत्यू, धुळे तालुक्यात एका बैलाचा मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यात अकोला तालुक्यात वीज पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. धुळे व गारबरडी येथे वीज पडल्यामुळे दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना दोन हेक्टपर्यंत प्रतिहेक्टरी कोरडवाहू शेतीसाठी ६,८००, फळ पिकासाठी प्रतिहेक्टरी १३,५०० आणि बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टरी १८ हजार रुपये याप्रमाणे मदत दिली जाणार आहे. मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.