नाशिक – शहरात आपत्कालीन स्थिती हाताळण्याची तयारी सुरू झाली आहे. नागरी संरक्षण दलाने उपलब्ध केलेले १३ भोंगे आपत्कालीन परिस्थितीत सतर्कतेचा इशारा देण्यासाठी राजीव गांधी भवन या महानगरपालिका मुख्यालयासह विविध भागात बसविण्यात येणार आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकमध्ये दाखल होणाऱ्या लाखो भाविकांना सूचना देण्यासाठी या व्यवस्थेचा उपयोग होणार आहे.

पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर हवाई हल्ल्यांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सतर्कतेचा इशारा देण्यासाठी भोंगे बसविण्याचा विषय पुढे आला होता. आपत्कालीन परिस्थितीत इशारा देण्यासाठी विविध शासकीय इमारती, अग्निशमन केंद्र व शाळा इमारतींवर भोंगे बसविण्याचे निर्देश गृह विभागाने दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने महानगरपालिकेला पत्राद्वारे सूचित केले.

नागरी संरक्षण दलाने १३ भोंगे महापालिकेला उपलब्ध केले. परंतु, हे काम पुढे सरकले नाही. महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी भोंगे बसविण्याची कार्यवाही वेळेत होणे आवश्यक असल्याचे सूचित केले. भोंगे बसविण्यासाठी काही जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. बांधकाम, विद्युत, शिक्षण व आपत्ती व्यवस्थापन विभागाने समन्वयाने भोंगे बसविण्याची काम तातडीने पूर्णत्वास न्यावे असे निर्देश खत्री यांनी दिले. अपवादात्मक परिस्थितीत जागा उपलब्ध होत नसल्यास पर्यायी जागा निश्चित करण्यास सांगण्यात आले आहे.

संपूर्ण शहरात आवाज पोहोचणार

संपूर्ण शहरात आवाज पोहोचेल या दृष्टीकोनातून नागरी संरक्षण दलाने महापालिकेला एकूण १३ भोंगे उपलब्ध केले आहेत. यातील काही भोंग्यांची क्षमता पावणेचार किलोमीटर तर काही भोंग्याची क्षमता सात किलोमीटर इतकी आहे. या माध्यमातून संपूर्ण शहरात आपत्कालीन परिस्थितीत इशारा देणे शक्य होईल. या बाबतची माहिती नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक अरूण जगताप यांनी दिली.

विभागवार ठिकाणे निश्चित

महानगरपालिकेने भोंगे बसविण्यासाठी काही जागा निश्चित केल्या आहेत. त्यामध्ये मनपा मुख्यालय (शरणपूर रोड), सातपूर विभागीय कार्यालय, मनपा शाळा क्रमांक ८९ (पाथर्डी फाटा), मनपा शाळा क्रमांक ४३ (काठे गल्ली), मनपा शाळा क्रमांक २० (शिवाजीनगर), मनपा शाळा क्रमांक २४ (विश्वासनगर), शाळा क्रमांक ६४ (विहितगाव), अंबड अग्निशमन केंद्र, नाशिकरोड विभागीय कार्यालय, पंचवटीतील अमृतधाम अग्निशमन केंद्र  यांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुंभमेळ्यात उपयोग ?

गोदावरी काठावर २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक सहभागी होण्याचा अंदाज आहे. वेगवेगळ्या मार्गाने शहरात प्रवेश करणाऱ्या भाविकांना सूचना देण्यात ही व्यवस्था महत्वाची ठरू शकते. अलीकडेच प्रयागराज महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती. २००४ मध्ये नाशिक कुंभमेळ्यात शाही मिरवणुकीवेळी चेंगराचेंगरी होऊन २९ भाविकांचा मृत्यू झाला होता. २०१५ मधील कुंभमेळा दुर्घटनेविना पार पडला. आगामी कुंभमेळ्यात गर्दीचे व्यवस्थापन मोठे आव्हान आहे. त्या दृष्टीने विविध पातळीवर नियोजन प्रगतीपथावर आहे. कुंभमेळ्यात भाविकांना सूचना वा सतर्कतेचा इशारा देण्यासाठी ही व्यवस्था उपयोगी ठरणार आहे.