कळवण एकात्मिक आदिवासी प्रकल्पातंर्गत असलेल्या कनाशी शासकीय आश्रमशाळेतील मुलींनी मुख्याध्यापिकेच्या मनमानी विरोधात मंगळवारी सकाळी १५ किलोमीटर अंतर चालत मोर्चा काढला. कळवण येथील प्रकल्प कार्यालयात ठिय्या दिला. प्रकल्प अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापिकेला कार्यमुक्त करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचा आदेश दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

अन्यायाविरोधात कनाशी शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता नववी ते १२ वीच्या सुमारे २५० मुली घोषणा देत कळवण एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडे चालू लागल्यावर आश्रमशाळा प्रशासनाचे धाबे दणाणले. शिक्षक कर्मचारी आणि मुख्याध्यापक अर्चना जगताप यांनी रस्त्यात ठिकठिकाणी मुलींना अडवून समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आम्ही फक्त प्रकल्प अधिकाऱ्यांशी बोलणार, असे ठणकावित मुलींनी प्रकल्प कार्यालय गाठले.

Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Kolhapur jobs 2024 Jilhadhikari Karyalay hiring
Kolhapur jobs 2024 : कोल्हापूरकरांनो, जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीची संधी! अधिक माहिती पाहा
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

हेही वाचा >>> लासलगावला कांद्याचा लिलाव रोखला, दरघसरणीविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, पंचायत समितीचे माजी उपसभापती विजय शिरसाठसह स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस प्रशासन आणि तहसीलदार बंडू कापसे यांनी मुलींशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, समस्या प्रकल्प अधिकाऱ्यांनाच सांगणार, त्यांना बोलवा, असा हट्ट मुलींनी कार्यालयात ठिय्या मांडत कायम ठेवला. स्थानिक प्रशासनाने हतबल होऊन दिल्ली येथे कामासाठी गेलेल्या प्रकल्प अधिकाऱ्यांशी दृकश्राव्य माध्यमातून सुमारे तासभर चर्चा केली. यावेळी मुख्याध्यापक जगताप यांच्याविषयी तक्रारींचा पाढाच मुलींनी कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांसमोर वाचला.

मुलींना, त्यांच्या पालकांना तसेच आश्रमशाळेत कार्यरत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे, थेट लाभार्थी खात्यातील पैसे जमा करणे, राज्यस्तरीय स्पर्धेत जिंकून आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान न करणे, परीक्षा कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रम घेणे, अशा अनेक तक्रारी थेट प्रकल्पाधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांच्याकडे मांडण्यात आल्या. तक्रारींची दखल घेत प्रकल्प अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक जगताप यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत तात्काळ कार्यमुक्त करण्याचा प्रस्ताव करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा >>> नाशिक: मंडळाची मदतवाहिनी विद्यार्थ्यांपासून दूरच; केवळ १२ जणांकडून लाभ

कनाशी आश्रमशाळा ही गुणवत्तेत क्रमांक एक होती. परंतू, चार महिन्यांपासून मुख्याध्यापक म्हणून रुजू झालेल्या जगताप यांच्या गैर वर्तनामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक कर्मचारीही दहशतीत आहेत. मुख्याध्यापिकेच्या गैरवर्तनाबाबत आ. नितीन पवार यांनीही प्रत्यक्ष आयुक्तांशी चर्चा केली होती. तरीही जगताप यांच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नाही. जगताप या दुसऱ्या आश्रमशाळेत असतानाही अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. अरेरावी करणाऱ्या मुख्याध्यापिकेविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, जयपूरचे सरपंच सुनील गायकवाड यांसह तालुक्यातील आदिवासी सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. दरम्यान प्रकल्प अधिकारी नरवाडे यांना मुलींच्या मोर्चाची माहिती सकाळी प्राप्त होताच पोलीस प्रशासनासह, महसूल विभाग, आरोग्य विभागातील कर्मचारी मोर्चा मार्गावर थांबले होते. उपाशीपोटी तक्रारीसाठी आलेल्या मुलींची जेवणाची व्यवस्था प्रकल्प कार्यालयाकडून करण्यात आली.