दुचाकीस्वारांच्या अपघाताचे प्रमाण सर्वाधिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : नुकत्याच संपलेल्या २०२० या वर्षांत जिल्ह्यात एकूण १६११ अपघात झाले. त्यात ९३५ जणांचा मृत्यू, तर १०३८ जण गंभीर जखमी झाले. २०१९च्या तुलनेत या वर्षांत अपघात आणि अपघातातील मृतांची संख्या काहीशी कमी झाली असली तरी करोनाच्या टाळेबंदीमुळे अनेक महिने वाहतुकीवर र्निबध होते. अतिवेगात वाहन चालविण्याने सर्वाधिक म्हणजे ७१ टक्के अपघात झाले. अपघातांमध्ये मयत होणाऱ्यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये जास्त अपघात झाले. त्यातही जिल्ह्यात सर्वाधिक १७ टक्के अपघात एकटय़ा मालेगाव तालुक्यात झाले आहेत.

३२व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर, प्रादेशिक परिवहन विभागाने जिल्ह्यातील अपघातांचे विश्लेषण केले आहे. २०१९ मध्ये नाशिक शहरात ५५३ आणि ग्रामीण भागात १३०० असे एकूण १८५३ अपघात झाले होते. शहरात १७७ आणि ग्रामीण भागातील  ७८३ अशा एकूण ९६० जणांचा अपघाती मृत्यू झाला. त्या वर्षांत १७५७ जण गंभीर जखमी झाले होते. २०२० या वर्षांत अपघातांची एकूण आकडेवारी २४२ने कमी झाली असली तरी करोनाच्या टाळेबंदीत अनेक महिने खासगी, सार्वजनिक वाहतूक बंद होती. यामुळे अपघातांचा धोका कमी झाला. ग्रामीण भागात झालेल्या एकूण अपघातांपैकी ३०.११ टक्के अपघात राष्ट्रीय महामार्गावर झाले. त्यामध्ये मयतांचे प्रमाण २८.९९ टक्के आहे. सर्वात जास्त अपघात हे सकाळी आठ ते दुपारी १२ आणि दुपारी चार ते रात्री १२ या कालावधीत झाल्याचे दोन वर्षांतील अपघातांच्या अभ्यासात उघड झाले आहे. सर्वात जास्त अपघात आणि अपघातांमध्ये मयत होण्याचे प्रमाण दुचाकीस्वार ५०.०३ टक्के असून खासगी मोटार, जीपसंदर्भात हे प्रमाण २३ टक्के आहे.

अपघात कमी करण्यासाठी १८ ते २५ वयोगटांतील नवीन परवान्यासाठी अर्ज करणाऱ्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि नाशिक फर्स्ट संस्थेच्या वतीने चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कमध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे. यात एकूण ३३ हजार ६४५ अर्जदारांना प्रशिक्षण देण्यात आले. करोनामुळे दोन तास ऑनलाइन प्रशिक्षण सुरू करण्यात आले.

डिसेंबर २०२० मध्ये ८०१ चालकांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रादेशिक परिवहन कार्यालयात रस्ता सुरक्षा मार्गदर्शन कक्षाची निर्मिती करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी दिली.

महामार्गावर ३२ टक्के  अपघात

जिल्ह्यात झालेल्या एकूण अपघातात निम्म्याहून अधिक म्हणजे ५०.०३ टक्के अपघात मोटारसायकल अर्थात दुचाकीचे आहेत. चारचाकी मोटारीचे २६.१०, बस २.११ आणि इतर वाहनांचे २१.७६ टक्के अपघात झाले. राष्ट्रीय महामार्गावर ३२ टक्के, राज्य महामार्गावर २० आणि अन्य महामार्गावर ४८ टक्के अपघात झाल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाने म्हटले आहे.

नोव्हेंबपर्यंत शहरात ३७२ अपघात

नाशिक शहरात नोव्हेंबर २०२० पर्यंत ३७२ अपघात झाले. त्यामध्ये १३४ जणांचा मृत्यू झाला तर ३४७ जण गंभीर जखमी झाले. २०१९ वर्षांच्या तुलनेत अपघातांचे प्रमाण कमी झाले असले तरी करोनाच्या टाळेबंदीत अनेक महिने खासगी, सार्वजनिक वाहतुकीवर प्रतिबंध होते. संचारबंदीमुळे बाहेर फिरण्यास बंदी होती. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1611 accidents in the nashik district during a year 935 people died zws
First published on: 19-01-2021 at 01:11 IST