नाशिक – घाटमाथ्यावर सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधून आतापर्यंत २० हजार ८२२ दशलक्ष घनफूट म्हणजे २१ टीएमसी पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे झेपावले आहे. महत्वाची बाब म्हणजे एक ते २३ जून या कालावधीत चार टीएमसीच्या आसपास पाण्याचा विसर्ग झाला होता. पावसाचा जोर वाढल्याने पंधरवड्यात १७ टीएमसी पाणी सोडण्यात आले.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यातील १४ धरणांमधून विसर्ग वाढविला जात आहे. गोदावरी, दारणासह अन्य नद्या दुथडी भरून वहात आहेत. गंगापूर, दारणा, पालखेड धरण समूहातील धरणांमधून सोडलेले पाणी नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून पुढे जायकवाडीत जाते. सोमवारी नांदूरमध्यमेश्वरमधून गोदावरी पात्रात ४३ हजार ८८२ क्युसेकने विसर्ग सुरू होता.

पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार एक जून ते सात जुलै या कालावधीत नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून एकूण दोन लाख ४० हजार ९०७ क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला. म्हणजे आतापर्यंत २० हजार ८२२ दशलक्ष घनफूट (सुमारे २१ टीएमसी) पाणी नांदूरमध्यमेश्वरमधून जायकवाडीकडे प्रवाहित झाले. मुसळधार पावसामुळे पंधरवड्यात विसर्गाचे प्रमाण लक्षणीय वाढले. हंगामाच्या प्रारंभीच्या २३ दिवसांत चार हजार ४०९ दशलक्ष घनफूट विसर्ग झाल्याची आकडेवारी आहे.

पावसामुळे लहान-मोठ्या २३ धरणांमधील जलसाठा ३६ हजार ४८ दशलक्ष घनफूटवर (७२ टक्के) पोहोचला आहे. धरण परिचालन सूचीनुसार जुलैच्या पूर्वार्धात किती जलसाठा करायचा हे प्रमाण निश्चित असते. ती पातळी आधीच ओलांडली गेली असल्याने अनेक धरणांमधून विसर्ग करावा लागत आहे.

गतवर्षीपेक्षा विपरित स्थिती

मागील वर्षी सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमी होते. यावर्षी विपरित स्थिती आहे. मुसळधार पावसाने जुलैच्या पूर्वार्धात नाशिक पाटबंधारे विभागाच्या २३ धरणांतील जलसाठा ७२ टक्क्यांवर पोहोचला आहे. गतवर्षी हे प्रमाण केवळ १२ टक्के होते. त्यामुळे सात जुलैपर्यंत विसर्ग झाला नव्हता. तेव्हा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मुसळधार पाऊस होऊन नांदूरमध्यमेश्वरमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाला होता. यावेळी प्रारंभीच्या काळात २१ टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

…तर समन्यायी पाणी वाटपाचा विषय संपुष्टात

जायकवाडी धरणात सध्या उपयुक्त जलसाठा ४२ टीएमसी आहे. नाशिकमधील नांदूरमध्यमेश्वर आणि अहिल्यानगरमधील भंडारदरा, निळवंडे धरणातून सोडलेले पाणी सध्याच्या वेगाने प्रवाहित होत राहिल्यास पुढील पाच दिवसांत जायकवाडीत ६५ टक्के जलसाठा म्हणजे उपयुक्त जलसाठा ५० टक्के होईल आणि समन्यायी तत्वावरील पाणी वाटपाचा विषय या वर्षासाठी संपुष्टात येईल, असे जलसंपदा विभागाचे माजी कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी म्हटले आहे.