मालेगाव – सूक्ष्म आणि लघु उद्योग सुरु करून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर राज्य शासनाचा भर असून त्याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतंर्गत राज्यात २५ हजार उद्योजक तयार करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.

सोमवारी तालुक्यातील अजंग-रावळगाव औद्योगिक वसाहतीमधील २७ प्रकल्पांचे भूमिपजन सामंत यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास माजी वस्त्रोद्योगमंत्री आ. प्रकाश आवाडे, आ. मौलाना मुफ्ती इस्माईल, आ. मंजुळा गावित, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ काॅमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, उद्योजक महेश पाटोदिया, प्रसाद हिरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>> डॉक्टर-रुग्णांमध्ये सुसंवादाची गरज ; आरोग्य विद्यापीठ दीक्षांत सोहळ्यात गिरीश महाजन यांचे प्रतिपादन

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत सुरुवातीच्या तीन वर्षात केवळ १७० कोटी अनुदान दिले गेले होते. मात्र, सहा महिन्यात ५५० कोटीचे अनुदान दिले गेल्याचा उल्लेख करत हे सरकार उद्योग-धंद्यांना चालना देण्यासाठी किती आग्रही आहे, हे बिंबवण्याचा प्रयत्न सामंत यांनी केला. बेरोजगारांना उद्योग सुरु करण्यासाठी अर्थसाह्य देताना सहकारी किंवा नागरी बँकांच्या तुलनेत राष्ट्रीयीकृत बँकांची कामगिरी निराशाजनक असल्याचे सांगत बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन सामंत यांनी केले.

महाराष्ट्रातील प्रकल्प अन्य राज्यात गेले, या विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपात काहीच तथ्य नसल्याचे सांगत गेल्या सहा महिन्यात एकही प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही, उलट काही प्रकल्प राज्यात आणले असल्याचा दावा सामंत यांनी केला. उद्योगांसाठी महाराष्ट्रात सर्वाधिक अनुकूल वातावरण आहे. उद्योग वाढीस प्रोत्साहन मिळावे म्हणून औद्योगिक धोरणात आमुलाग्र बदल करण्यात येत असल्याचे सामंत यांनी सांगितले. प्रास्ताविक उद्योजक अरविंद पवार यांनी केले. आभार बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय दुसाने यांनी मानले.

हेही वाचा >>> नाशिक : चाळीस जणांची काळजी करु नका; गिरीश महाजन यांचा अजित पवार यांना सल्ला

३५० भूखंडांचे वाटप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

८६३ एकरवर उभ्या राहिलेल्या अजंग-रावळगाव औद्योगिक वसाहतीत आतापर्यंत ३५० भूखंडांचे वाटप झाले असून तेथील काही प्रकल्पांचे प्रत्यक्ष उत्पादन लवकरच सुरु होईल, अशी अपेक्षा पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली. भूमिपूजन झालेल्या २७ प्रकल्पांच्या माध्यमातून ५०० कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून अनेकांना रोजगार उपलब्ध होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. औद्योगिक महामंडळाचे अधिकारी सध्या एक दिवस मालेगावला येत असतात. पण उद्योजकांच्या सोयीसाठी येथे महामंडळाचे उपकेंद्र सुरु करावे, अशी मागणीही भुसे यांनी उद्योग मंत्र्यांकडे केली.