लष्करी भरतीवेळी धक्काबुक्कीमुळे गोंधळ
नाशिक : देवळाली येथील लष्कराच्या प्रादेशिक थल सेना ११६ इन्फंट्री बटालियनमध्ये सैनिक, लिपिक आणि इतर ६३ जागांसाठी भरती प्रक्रियेत महाराष्ट्रासह इतर राज्यातून सुमारे ३० हजार युवक शहरात दाखल झाले आहेत. परतीचा पाऊस, गारवा या स्थितीत युवकांनी मिळेल, तिथे पथारी टाकून रात्र काढली. बुधवारी पहाटे युवकांना एका मैदानावरून दुसऱ्या मैदानावर सोडले जाणार होते. यासाठी लोखंडी जाळ्या हटविल्यानंतर रेटारेटी होऊन काही काळ गोंधळ उडाला. दोन-तीन युवक खाली पडून किरकोळ जखमी झाले. पहिल्या दिवशी सुमारे १० हजार युवकांची शारीरिक चाचणी पार पडल्याचे सांगितले जाते.
भरतीची ही प्रक्रिया देवळाली कॅम्पच्या आनंदरोड मैदानावर असलेले बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल आणि धोंडी रोडवरील टीए पॅराच्या मैदानावर सुरू झाली. नऊ राज्यांसह तीन केंद्रशासित प्रदेशातील उमेदवार त्यात सहभागी झाले आहेत. यासाठी मंगळवारी सकाळपासून राज्यासह इतर भागातील युवक देवळाली कॅम्प, नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरात दाखल होण्यास सुरुवात झाली.
नोकरीच्या शोधात आलेल्या युवकांना पहिला फटका नैसर्गिक स्थितीचा बसला. तीन-चार दिवसांपासून शहर परिसरात पाऊस सुरू आहे. वातावरणात कमालीचा गारवा पसरलेला आहे. यामध्ये त्यांना जिथे जागा मिळेल, तिथे रात्र काढावी लागली. एरवी, उमेदवारांना भोजन, पाणी देण्यासाठी राजकीय पक्ष पुढाकार घेतात. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षांनी त्याच्याकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. नाशिकरोड ते देवळाली कॅम्पच्या मैदानापर्यंतच्या भागात तरुणांचे जत्थे दिसत होते. अनेकांना रात्र मैदान, पदपथ, बसथांबे, रेल्वे स्थानकावर काढावी लागली.
इच्छुकांची संख्या बरीच मोठी होती. त्यात महाराष्ट्रातून आलेले अधिक होते. शारीरिक चाचणी वा तत्सम प्रक्रियेला वेळ लागेल हे लक्षात घेत संबंधितांना संसरी नाक्यावरील मैदानावर एकत्रित करण्यात आले. पहाटे त्यांना पुढील प्रक्रियेसाठी दुसऱ्या मैदानावर नेले जाणार होते. मैदानावर लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या होत्या. पहाटे या जाळ्या काढून त्यांना रांगेत सोडण्याचे काम सुरू झाले. तेव्हाच काही युवकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. ढकलाढकली होऊन गोंधळ उडाला.
