धुळे : पोलिसांनी वेळोवेळी सतर्क राहण्याचे आवाहन केल्यावरही जिल्ह्यात सायबर फसवणुकीची प्रकरणे सातत्याने वाढतच असल्याचे अदोरेखित झाले आहे. असे असताना देवपुरातील नकाणेरोड परिसरात घडलेली नवी घटना नागरिकांना सावधतेचा इशारा देणारी ठरली आहे.
अविनाश विष्णू शिनकर हे ६२ वर्षीय सेवानिवृत्त अभियंता शहरातील प्रमोद नगरमध्ये (सेक्टर क्र. ३) राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाईल व्हॉट्सअॅपवर अज्ञात व्यक्तीने संपर्क केला आणि त्यांच्या जीवनात मोठे संकट ओढवले. समोरच्या व्यक्तीने आपले नाव अंकित शर्मा असे सांगत आपण आयपीएस अधिकारी असल्याचा आव आणला. त्याने मनी लाँड्रिंग प्रकरणात तुमचे नाव समोर आले असून लवकरच तुमच्यावर कारवाई होणार असल्याची भीती दाखवली.
आयपीएस दर्जाच्या अधिकारीद्वारे थेट धमकी मिळाल्यामुळे घाबरलेल्या शिनकर यांनी ’त्या’ व्यक्तीने सांगितलेल्या बँक खात्यांमध्ये पैसे भरायला सुरुवात केली. १२ सप्टेंबर ते २४ ऑक्टोबरदरम्यान विविध खात्यांमध्ये शिनकर यांनी आरटीजीएसद्वारे तब्बल ६४ लाख रुपये जमा केले. पैसे दिल्यानंतरही संशयित व्यक्ती त्यांच्यावर दबाव टाकत राहिला.
अखेर हा प्रकार शिनकर यांनी कुटुंबीय आणि निकटवर्तीयांना सांगितला. हा धक्कादायक आणि फसवणुकीचा प्रकार असल्याचे म्हटलेगेल्याने शिनकर यांनी तात्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेतली आणि संबंधित अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.
धुळे जिल्ह्यात यापूर्वीही अशाच पद्धतीच्या सायबर फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. कधी बँक अपडेट, कधी केवायसी, कधी खात्यातील संशयास्पद व्यवहार, तर कधी सरकारी अधिकाऱ्यांचे नाव वापरून नागरिकांना फसवले जाते. विशेषतः निवृत्त सरकारी कर्मचारी, व्यापारी, तसेच डिजिटल व्यवहार करणाऱ्या नागरिकांना लक्ष्य केले जाते. सायबर गुन्हेगार बनावट आयडी, फेक नंबर आणि खोटे सरकारी लोगो वापरून लोकांच्या विश्वासाला तडा देतात.
या घटनेनंतर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना अत्यंत सावध राहण्याचे आवाहन केले. याआधीही पोलिसांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून व्हॉट्सअॅप कॉल, बँक तपशील मागण्याच्या विनंत्या, मनी लाँड्रिंग किंवा केवायसी अपडेटच्या नावाने धमक्या आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. या फसवणुकीचा तपास सायबर सेलच्या सहाय्याने तांत्रिक स्तरावर सुरू असून व्यवहारांचा तपशील मिळवण्यात येत आहे.
संशयितांनी वापरलेल्या खात्यांचे लोकेशन व मोबाईल तपशील तपासले जात आहेत. पोलिसांनी लवकरच गुन्ह्याचा उलगडा होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. ही घटना नागरिकांसाठी धोक्याची घंटा आहे. डिजिटल व्यवहार करताना जागरूक राहणे, अज्ञात कॉल किंवा संदेशांवर कधीही विश्वास न ठेवणे आणि त्वरित पोलिसांची मदत घेणे अत्यावश्यक आहे.
धुळे जिल्ह्यातील सायबर फसवणुकीच्या घटनांचा सातत्याने वाढता आलेख पाहता, पोलिस प्रशासनाने नागरिकांमध्ये जनजागृती वाढवण्यासाठी विशेष मोहिमा राबवण्याची तयारी सुरू केली आहे. शाळा-कॉलेजांपासून व्यापारी संघटना, सामाजिक संस्था व ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ऑनलाइन सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मदतीने विविध उपक्रम राबवून नागरिकांना डिजिटल व्यवहारातील धोके आणि त्यावरचे उपाय समजावून सांगण्याचीही योजना आहे.
विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्त अधिकारी हे सायबर गुन्हेगारांचे प्रमुख लक्ष्य असल्याने त्यांना सुरक्षित डिजिटल व्यवहाराचे प्रशिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे. दरम्यान, या प्रकारामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी सायबर पोलिसांनी नागरिकांना आत्मविश्वास देत कोणत्याही प्रकारच्या धमक्या, संशयास्पद लिंक, कॉल किंवा आर्थिक व्यवहारांबाबत ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
“सरकारी अधिकारी किंवा पोलिस विभाग कधीही फोनवरून खात्याची माहिती, पैसे भरण्याचे निर्देश किंवा मनी लाँड्रिंगची भीती दाखवत नाही,” हे स्पष्ट करत पोलिसांनी नागरिकांना काही सेकंदांच्या घाईत घेतलेला निर्णय आयुष्यभराची संपत्ती घालवणारा ठरू शकतो, अशी ताकीद दिली आहे. डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा वापर वाढला असला तरी त्याचबरोबर सतर्कता, जागरूकता आणि योग्य वेळी पोलिसांची मदत घेणे हीच सुरक्षिततेची गुरुकिल्ली असल्याचे पुन्हा अधोरेखित करण्यात आले आहे.
