यावल तालुक्यातील अट्रावल येथील शेतकर्‍याच्या यावल शेतशिवारातील क्षेत्रात लागवड केलेल्या केळीच्या सात हजार खोडांसह घडही कापून फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावल तालुक्यातील अट्रावल येथील रहिवासी राजेंद्र चौधरी यांच्या यावल शेतशिवारातील एक हेक्टर ८६ आर या क्षेत्रात केळीची नऊ हजारांवर रोपांची लागवड करण्यात आली आहे. शनिवारी राजेंद्र आणि त्यांचा मुलगा भूषण चौधरी, तसेच सोबत राकेश पावरी व राहुल पावरी हे शेतात काम करण्यासाठी गेले होते. दुपारी दोनच्या सुमारास मात्र ते गेले नव्हते.

हेही वाचा >>> नाशिक: शालेय वाहनाखाली सापडून बालिकेचा मृत्यू

रविवारी सकाळी भूषण चौधरी हा शेतात पाहणीसाठी गेला. सकाळी आठच्या सुमारास त्यांच्या शेतातील केळीच्या सात हजार खोडांसह घडांची माथेफिरूने नुकसान केल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती भूषण चौधरी याने वडील राजेंद्र चौधरींना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत दिली. राजेंद्र चौधरी यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत परिसरातील शेतकर्‍यांना घडलेला प्रकार सांगितला. परिसरातील शेतकर्‍यांनी धाव घेत केळीचे नुकसान केल्याचे पाहून संताप व्यक्त केला. याबाबत राजेंद्र चौधरी यांनी यावल येथील पोलीस ठाण्यात धाव घेत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. यात २५ लाखांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, फैजपूर विभागाचे पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना यावल येथील पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी संबंधित प्रकाराबाबतची माहिती दिली. डॉ. कुणाल सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. जळगाव येथून श्‍वानपथकास पाचारण केले. यापूर्वीदेखील यावल तालुक्यातील अनेक शेतशिवारांमध्ये केळी व अन्य पिकांची नासधूस करण्याचे विकृत प्रकार घडले आहेत. आता पुन्हा एकदा असाच प्रकार यावल तालुक्यातील अट्रावल शिवारात घडल्याने परिसरातील शेतकर्‍यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.