धुळे – महायुती, मविआ आणि वंचित बहुजन आघाडीने याआधीच उमेदवार जाहीर केले असताना एमआयएमतर्फेही धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने मतदारसंघात चौरंगी लढत होऊ शकते. विरोधी मतांची विभागणी होणार असल्याने गेल्या दोन वेळच्या निवडणुकांचा अनुभव पाहता चौरंगी लढत महायुती म्हणजेच भाजपच्या उमेदवाराच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

धुळे मतदार संघात डॉ. सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन प्रतिस्पर्धी पक्षांच्या तुलनेत भाजपने आघाडी घेतली. यानंतर साधारणपणे महिन्यानंतर मविआतर्फे काँग्रेसने माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली. वंचित बहुजन आघाडीने माजी पोलीस अधिकारी अब्दुर रहेमान यांचे नाव जाहीर केले.

हेही वाचा – सप्तश्रृंग गडावर साडेपाच लाखाचे भेसळयुक्त गोडपदार्थ जप्त

धुळे लोकसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीत काँग्रेसला सुटल्याने काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर आणि नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले होते. तथापि बहुप्रतीक्षेनंतर काँग्रेस श्रेष्ठीनी या दोघांपैकी एकालाही उमेदवारी न देता माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली. डॉ. बच्छाव यांचे नाव जाहीर होताच सनेर आणि शेवाळे यांनी पक्षनेत्यांवर आगपाखड करत आपापल्या पदांचे राजीनामे दिले. आम्हाला मतदारसंघाबाहेरील उमेदवार नको, अशी भूमिका घेत दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली धुळे व नाशिक जिल्ह्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उमेदवार बदलून द्यावा, अशी मागणी केली.

उमेदवार बदलून न दिल्यास आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराबरोबर राहणार नाही. असा पवित्रा घेण्यात आला. उमेदवार बदलून मिळावा म्हणून पक्षनेत्यांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली. तथापि जाहीर झालेला उमेदवार बदलण्यात आला नाही. यामुळे डॉ. बच्छाव यांना स्वपक्षातूनच विरोध सुरु झाला. डॉ. बच्छाव यांना दोन्ही जिल्ह्यात काँग्रेस अंतर्गत निर्माण झालेल्या गटबाजीला सामोरे जावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर, धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या नाराज गटाने समविचारी पक्ष, संघटनाच्या सहभागातून चिंतन बैठक घेतली. या बैठकीत तीसरी आघाडी निर्माण करून निवडणूक रिंगणात तिसऱ्या आघाडीचा स्वतंत्र उमेदवार देण्याच्या तयारीला वेग आला आहे. याचवेळी एमआयएमतर्फे ऐनवेळी उमेदवार जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – नाशिकच्या जागेचे भवितव्य ठाण्यावर अवलंबून, तिढा कायम

धुळे लोकसभा मतदारसंघ हा धुळे आणि नाशिक या दोन जिल्ह्यात विभागला गेला आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य आणि बागलाण हे तीन तर, धुळे जिल्ह्यातील धुळे शहर, धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा अशा तीन विधानसभा मतदारसंघाचा धुळे या लोकसभा मतदारसंघात समावेश आहे.

काँग्रेस आणि भाजप यांच्या उमेदवारांमुळे नाराज असलेल्या तीसऱ्या आघाडीतर्फे कुणाला उमेदवारी देण्यात येते, ते एक मे रोजी समजणार आहे. या आघाडीच्या पहिल्या चिंतन बैठकीचे नेतृत्व लोकसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अनिल गोटे यांनी केले होते. निवडणूक रिंगणात भाजपचे डॉ. भामरे यांच्यासह चार उमेदवार असतील. यामुळे धर्मनिरपेक्ष म्हणून काँग्रेसला पसंती देत आलेल्या हक्काच्या म्हटल्या जाणाऱ्या मतांची साहजिकच चार भागात विभागणी होईल. या मतविभाजनाचा फायदा डॉ. भामरे यांना होऊ शकेल, असे म्हटले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपली वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून येत्या दोन दिवसात धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याबाबत पक्षाचा निर्णय होऊ शकेल. उमेदवारीसाठी दोन जण इच्छुक आहेत. लवकरच पक्षाची भूमिका कळेल. – नासिर पठाण (एमआयएम, जिल्हाध्यक्ष धुळे)