लोकसत्ता वार्ताहर

धुळे: शेतीची खातेफोड करुन तिघा भावांच्या नावाने सातबारा तयार करुन देण्यासाठी लाच मागितल्याने महिला तलाठीसह संगणक चालक आणि कोतवाल अशा तीन जणांविरुद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. साक्री तालुक्यातील रोजगाव येथे ही कारवाई झाली.

साक्री तालुक्यातील जैताणे (हल्ली मुक्काम तळोदा) येथील एकाची रोजगाव (ता.साक्री) शिवारात शेती आहे. या शेतीची खातेफोड करुन तीन भावांच्या नावाने सातबारा तयार करुन देण्याच्या मोबदल्यात रोजगाव येथील तलाठी ज्योती पवार यांनी ४० हजार रुपयांची मागणी केली. ठरलेल्या रकमेपैकी १० हजार रुपये संबंधित व्यक्तीकडून आणि मार्च २०२३ मध्ये त्या व्यक्तीच्या वडिलांकडून १० हजार रुपये असे एकूण २० हजार रुपये घेण्यात आले.

हेही वाचा… नाशिक: कर्जवसुली प्राधिकरणासाठी अर्थमंत्र्यांना साकडे

या लाच मागणीची संबंधित व्यक्तीने १८ एप्रिल २०२३ रोजी नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार केली. या तक्रारीची पंच आणि साक्षीदारांसमक्ष पडताळणी करण्यात आली. तलाठी पवार यांनी खातेफोड करुन देण्याच्या मोबदल्यात उर्वरीत २० हजार रुपयांची मागणी करुन तडजोडीअंती १५ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्यावर तक्रारदार हे तलाठी पवार यांना ठरलेली रक्कम देण्यास गेले.

हेही वाचा… शिरपूर तालुक्यात संशयिताकडून मशिनगनसह २० गावठी बंदुका, काडतुसे जप्त; वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परंतु, त्या ठरलेल्या जागेवर आढळल्या नाहीत. कार्यालयातील संगणक चालक योगेश सावळे यांनी तक्रारदारांना पैसे आणलेत का, असे विचारुन लाचेची मागणी केली. कारवाईदरम्यान संगणक चालक सावळे आणि जैताणे येथील कोतवाल छोटू जाधव यांनी तलाठी पवार यांच्या सांगण्यावरुन तक्रारदारांच्या राहत्या घरी जाऊन पुन्हा पंच साक्षीदारांसमक्ष लाचेची मागणी केली. याप्रकरणी तिघांविरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.