जळगाव : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडून मोठ्या प्रमाणावर पुस्तकांची खरेदी करण्यात आली आहे. मात्र, बऱ्याच ग्रंथालयांना पुस्तकेच पोहोचलेली नाहीत. त्यामुळे पुस्तकांच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची शक्यता व्यक्त करून संबंधितांची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार पारोळा तालुक्यातील धुळपिंप्री येथील साने गुरूजी वाचनालयाचे अध्यक्ष अरूण जगताप यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
जगताप यांनी ग्रंथालय संचालनालयासह राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. जळगाव जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांनी जिल्हाभरातील बऱ्याच ग्रंथालय व वाचनालयांना पुस्तकांचा पुरवठा न करता संबंधितांकडून आधीच स्वाक्षरी आणि शिक्के असलेले ग्रंथालय, वाचनालयाचे नाव असलेले पत्र जमा करून घेतले होते. ज्यांचा वापर करून नंतर त्यांनी पुस्तके मिळाल्याबाबतचे बनावट पत्र तयार करून घेतले. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, पारोळा, एरंडोल आणि जळगाव तालुक्यातील बऱ्याच वाचनालयांचा त्यात समावेश आहे.
संबंधित सर्व वाचनालयांना पुस्तके न देताच त्यासाठी मंजूर झालेला निधी परस्पर लाटल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे काही ग्रंथालयांना २०१९ आणि २०२० या वर्षाची पुस्तके २०२३-२४ मध्ये वितरीत केली आहेत. बऱ्याच ग्रंथालयांना अद्याप कोणतीच पुस्तके मिळालेली नाहीत. धक्कादायक प्रकार म्हणजे काही ग्रंथालयांना ९० हजार रुपये किंमतीची पुस्तके द्यायची होती. प्रत्यक्षात फक्त ३० हजार रुपयांची पुस्तके पुरविण्यात आली आहेत. माहितीच्या अधिकारात ही सर्व माहिती उघड झाली आहे. या प्रकरणाची निःष्पक्ष चौकशी करून सात वर्षांपासून एकाच जागेवर ठाण मांडून बसलेल्या जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी. योग्य तो न्याय न मिळाल्यास मुंबईत ग्रंथालय संचालकांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा देखील अरूण जगताप यांनी दिला आहे.
आमदार निधीतून खरेदी केलेली पुस्तके जळगाव जिल्ह्यातील ग्रंथालयांना वेळोवेळी व नियमानुसार पुरविण्यात आली असून, त्याची पोहोच देखील संबंधितांकडून घेण्यात आली आहे. पुस्तक वाटपात कोणताही गैरप्रकार झालेला नाही. – सुहास रोकडे (जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जळगाव