नाशिक – शहरात हत्या, हाणामारी,चोरी थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसून पंचवटीतील मखमलाबाद रस्त्यावरील वडजाई माता नगर येथील पेट्रोल पंपावर शुक्रवारी रात्री पाच ते सहा जणांनी तरूणाला मारहाण केली. मारहाणीत अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

रुपेश काळे (१८, रा. स्वामी विवेकानंद नगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून रूपेश आणि त्याचा मित्र कृष्णा धात्रक (१७) हे दोघे शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घरी जात होते. वडजाईमाता नगर येथील युगंधर पेट्रोल पंपाजवळ रुपेशच्या ओळखीचे भोला रायकर, अभि वाघ, अनिकेत तिडके आणि गणेश सोनवणे हे उपस्थित होते. जुन्या भांडणाचा राग मनात धरून चारही संशयितांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

भोलाने त्याच्याकडील तीक्ष्ण हत्याराने कृष्णाच्या उजव्या डोळ्यावर दुखापत केली. कृष्णा हा जीव वाचवून पळत असताना अनिकेत आणि गणेश यांनी त्याला खाली पाडून त्याच्या गुडघ्यावर दगडाने मार दिला. हा प्रकार पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मारहाणीत कृष्णा गंभीर जखमी झाला असून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपासून शांतीनगर, घाडगे मळा, रामकृष्ण नगर परिसरात टवाळखोरांचा हैदोस वाढला आहे. भरधाव वेगाने दुचाकी चालविणे, दुचाकीच्या सायलेन्सरमधून फटाके फोडण्यासारखे आवाज काढणे असे प्रकार होत आहेत. सिडको, अंबड, नाशिकरोड परिसराप्रमाणे आता मखमलाबाद भागातही गुन्हेगारी फोफावू लागली आहे. त्यामुळे शांतताप्रिय रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांतर्फे मागणी करण्यात येत आहे.