नाशिक – शहरातील वाढत्या गुन्हेगारी विरोधात शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसेने काढलेल्या संयुक्त आक्रोश मोर्चात पंचवटीतील हत्या प्रकरणातील संशयित भाजपचा फरार माजी नगरसेवक उद्धव निमसे पोलिसांना कसा सापडत नाही, त्याला कोण वाचवत आहे, असे प्रश्न करीत खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या मंत्र्यांवर टिकास्त्र सोडले होते. या आरोपानंतर चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी फरार माजी नगरसेवक निमसे हे पोलिसांना शरण आले.

नांदूर नाका परिसरात गेल्या महिन्यात २२ ऑगस्ट रोजी मारहाणीची घटना घडली होती. टोळक्याने अजय कुसाळकर (२७) आणि राहुल धोत्रे यांच्यावर हल्ला केला होता. उपचारादरम्यान राहुल धोत्रे या युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. काही जणांना पोलिसांनी अटक केली. परंतु, संशयित भाजपचा माजी नगरसेवक उद्धव निमसे हे फरार होते. घटनेच्या २४ व्या दिवशी संशयित निमसे हे वकिलासह गुंडा विरोधी पथकाच्या कार्यालयात शरण आले.

शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या संयुक्त मोर्चात खा. संजय राऊत यांनी धोत्रे या युवकाची हत्या सत्ताधारी मंत्र्यांच्या कार्यकर्त्यानी केल्याचा आरोप केला होता. आंदोलन करणारे आमचे कार्यकर्ते पोलिसांना मिळतात, परंतु, भाजपचा माजी नगरसेवक मिळत नाही. भाजपचा नगरसेवक हत्या करून फरार होतो. फरार असताना तो मंत्री गिरीश महाजन यांना बंगल्यावर भेटतो. त्याला कोण वाचवतेय, संशयित निमसे कुठल्या सरकारी बंगल्यात लपलाय. असे प्रश्न करीत त्यांनी गृहमंत्र्यांनाही लक्ष्य केले होते.

या घडामोडीनंतर फरार संशयित उद्धव निमसे हे पोलिसांना शरण आले. निमसे यांच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संशयित निमसे हे स्वताहून पोलिसांना शरण आल्याचे नमूद केले. या प्रकरणात निमसे यांचा काहीही दोष नाही. गुन्हा घडला, तेव्हा निमसे हे कार्यालयात होते. या संदर्भातील सीसी टीव्ही चित्रण उपलब्ध आहे. मारामारीची घटना घडून गेल्यानंतर ते कसे चिथावणी देतील, असा प्रश्न वकिलांनी केला. उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाला नाही. या प्रकरणात वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आले.

गरीब लोकांना त्रास व्हायला लागला. न्यायालयीन आदेशाची प्रत अपलोड झाल्यानंतर निमसे यांनी पोलिसात शरण जाण्याचे निश्चित केल्याचे वकिलांकडून सांगण्यात आले. उपरोक्त प्रकरणात निमसे यांना अटक करण्यात आली. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.