जळगाव : अल्पवयीन मुलीसोबत सायबर कॅफेत बसल्याच्या संशयावरून जामनेर शहरात जमावाने केलेल्या मारहाणीत एका तरूणाचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत नऊ संशयितांना अटक केली असताना, समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी सर्व संशयित हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या चालकाचा मुलगाही त्यात सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बेटावद खुर्द येथील रहिवाशी असलेला तरूण सुलेमान पठाण हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता मुलगा होता. जामनेर शहरातील एका सायबर कॅफेत तो एका अल्पवयीन मुलीसोबत बसल्याची माहिती त्याच्या गावातील काही तरूणांना मिळाली होती. त्यानुसार, तरूणांच्या टोळक्याने कॅफेवर जाऊन सुलेमानला बेदम मारहाण केली. तेवढ्यावरच न थांबता त्याला बसस्थानकावर तसेच बेटावद येथे गेल्यानंतर त्याच्या घराजवळही मारहाण केली. जमावाच्या मारहाणीत डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झालेला सुलेमान घरी गेल्यानंतर पाणी प्यायला. त्यानंतर भोवळ येऊन त्याचा मृत्यू झाला. मृत सुलेमानचे वडील रहीम पठाण यांनी तक्रार दिल्यानंतर जामनेर पोलीस ठाण्यात १० ते १२ जणांच्या विरोधात मॉब लिचिंगसह खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
सुलेमानच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या जमावातील संशयितांपैकी नऊ जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक देखील केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्याची मागणी मृत सुलेमानच्या नातेवाईकांकडून केली जात आहे. त्या बाबतीत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी यापूर्वीच केली आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी बेटावद (ता. जामनेर) येथे मृत सुलेमानच्या कुटुंबियांची सोमवारी भेट घेतली. पैकी आमदार आझमी यांनी जळगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. जामनेर शहरात एका मुलीसोबत बसल्याच्या संशयावरून जमावाने सुलेमान पठाणला बेदम मारहाण केली. वास्तविक त्यास पोलिसांच्या ताब्यात देता आले असते, कायदा हातात घेण्याची काहीच गरज नव्हती. हे सर्व दिवसाढवळ्या घडत असेल तर सरकार काय करत आहे, असा प्रश्न आझमी यांनी उपस्थित केला.
गिरीश महाजन हे मंत्री असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. सुलेमानच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या जमावात त्यांचे म्हणजे भाजपचे कार्यकर्ते होते. विशेष म्हणजे महाजन यांच्या मोटारीच्या चालकाचा मुलगाही संशयितांमध्ये सामील आहे. त्यामुळे कसा काय न्याय मिळेल, अशी शंका अबू आझमी यांनी व्यक्त केली. या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशाचा समावेश असलेल्या विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्यात यावी. तसेच जमावाच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या सुलेमानच्या कुटुंबियांना २५ लाख रूपयांची मदत तत्काळ करावी. पठाण कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणीही आमदार आझमी यांनी केली.