नाशिक : नाशिक-वणी रस्त्यावर बुधवारी रात्री दिंडोरी बाजार समितीसमोर झालेल्या अपघाताचे कारण मोटारीचे टायर फुटणे, हे असले तरी या अपघाताने या रस्त्याच्या व्यवस्थेकडे पुन्हा सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. अतिशय रहदारीचा हा रस्ता असतानाही चौपदरीकरणाकडे होणारे दुर्लक्ष, अपघातांसाठी कारण ठरत असल्याचा आरोप दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी केला आहे. अरुंद रस्त्याने अधिक वाहने धावत असल्याने नाशिक-वणी रस्ता म्हणजे मृत्युचा सापळा झाला आहे. बुधवारी रात्री झालेल्या अपघातस्थळाची पोलीस, आरटीओ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील रस्ता सुरक्षा समितीकडे सादर करण्यात येणार आहे.
बुधवारी रात्री दिंडोरीपासून दीड किलोमीटर अंतरावर झालेल्या विचित्र अपघातात मोटार चारीत पडून सात जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव मोटारीचे उजवीकडील टायर फुटल्याने ती अनियंत्रित होऊन समोरून येणाऱ्या दुचाकीला धडकली. नंतर पाणी साचलेल्या चारीत कोसळली. एखाद्या ठिकाणी तीन वर्षात १० जणांचा मृत्यू झाला असेल किंवा एकाच अपघातात पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्यास अशा रस्त्याचा ५०० मीटरचा भाग अपघातप्रवण क्षेत्रात समाविष्ट होतो. अशी घटना घडल्यास पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन अहवाल सादर करणे अभिप्रेत असते. त्या अनुषंगाने तिन्ही यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन अवलोकन केले. पुढील काळात अशा घटना रोखण्यासाठी संबंधित विभागाकडून अहवाल सादर केला जाईल, असे सांगण्यात आले.
दिंडोरी बाजार समितीसमोरील भाग अपघातप्रवण क्षेत्रात समाविष्ट नव्हता. अपघाताची वेगवेगळी कारणे असतात. या अपघातास रस्त्यात काही दोष नव्हता. टायर फुटल्याने भरधाव गाडी अनियंत्रित होऊन अपघात झाल्याचा तपास यंत्रणेचा प्राथमिक निष्कर्ष आहे. घटनास्थळावरील परिस्थितीची माहिती अहवालातून यंत्रणांकडून सादर केली जाईल. रस्ता सुरक्षेसाठी जिल्ह्यात दोन समिती कार्यरत आहेत. यातील एक खासदारांच्या अध्यक्षतेखालील रस्ते सुरक्षा समिती तर दुसरी जिल्हाधिकारी पदसिद्ध अध्यक्ष असणारी जिल्हास्तरीय रस्ते सुरक्षा समिती आहे. पोलीस आणि अन्य यंत्रणांकडून अपघाताचा अहवाल जिल्हास्तरीय रस्ते सुरक्षा समितीकडे सादर करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील अपघातप्रवण क्षेत्रात घट
जिल्ह्यातील विविध महामार्गांवर ७९ अपघातप्रवण क्षेत्रे होती. रस्त्यांचे चौपदरीकरण व संबंधित विभागांनी केलेल्या उपायांमुळे अपघातप्रवण क्षेत्रे मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
चौपदरीकरण गरजेचे
नाशिक-वणी रस्त्याच्या चौपदरीकरणाची अनेक वर्षांपासून मागणी केली जात आहे. दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा हा रस्ता आहे. स्वामी समर्थ केंद्र. सप्तशृंगी गडावर जाणारे भाविक तसेच गुजरातच्या सापुतारा भागात ये-जा करणारे पर्यटक, आसपासच्या भागातून नोकरी व कृषिमाल विक्रीसाठी दररोज नाशिकला ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अतिशय वर्दळीचा हा मार्ग मृत्युचा सापळा झाला आहे. या मार्गाचे तातडीने चौपदरीकरण होणे आवश्यक आहे. परंतु, वेगळी कारणे पुढे केली जातात. सातत्याने अपघात होऊनही सरकारचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी केला. रस्त्यालगत मुरुमासाठी खड्डे खोदून ठेवले गेले. पावसाचे पाणी त्यात साचल्याने अपघातग्रस्तांना बाहेर पडता आले नाही. अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा त्यास कारक ठरल्याची तक्रार खासदार भगरे यांनी केली.