धुळे: ठाण्याप्रमाणेच धुळ्यात महायुतीतील शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. यामुळे धुळेकरांची करमणूक होत आहे. दोन्ही बाजूंकडील पदाधिकारी एकमेकांवर आगपाखड करत आहेत.
महायुतीतील भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तीनही पक्षांचे वरिष्ठ नेते आम्ही एक आहोत, असा नारा देत असले तरी स्थानिक पातळीवर मात्र तशी एकी दिसत नाही. धुळे शहरातील सध्याचे चित्र त्याचेच द्योतक आहे. धुळे बाजार समितीचे संचालक तथा सतत व्हेजिटेबल असोसिएशन आणि कमिशन एजंट संघटनेचे अध्यक्ष, छत्रपती संभाजीराजे लोटगाडी युनियनचे अध्यक्ष महादेव परदेशी यांनी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांना अशाच पत्रकबाजीवरून सुनावले आहे.
फेरीवाल्यांना सरसकट निष्कासित करणे ही राक्षसी वृत्ती घातक आहे. शहर झकास करण्याच्या नादात भकास होत असल्यापासून वाचवा, असे आवाहन शिंदे गटाचे धुळे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी पत्रकातून केले. महादेव परदेशी यांनी तेवढ्याच आक्रमकपणे मोरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. महापालिकेने नो हॉकर्स झोन जाहीर केल्याने शहरातील पाचकंदील ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंतच्या अंतरात रस्त्यावर भाजीपाला आणि अन्य वस्तू विक्रेत्यांना व्यवसायास प्रतिबंध केला आहे. देवपूरातील दत्तमंदिर परिसरातील मुख्य रस्त्यावर व्यवसाय थाटणाऱ्या विक्रेत्यांनाही नवरंग जलकुंभाजवळ जागा उपलब्ध करून देण्यात आली. त्यांचे प्रत्यक्ष स्थलांतरही करण्यात आले आहे.
मनोज मोरे यांचे नाव न घेता महादेव परदेशी यांनी भावना व्यक्त करताना आमदार अनुप अग्रवाल यांचे गुणगा्न केले आहे. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या पाचकंदीलमधील महापालिकेच्या व्यापारी संकुलांचे नूतनीकरण करून त्या ठिकाणी भाजीपाला व फळे विक्रेत्यांना ओटे उपलब्ध होईपर्यंत जे. बी.रोडवर व्यवसाय करू देणे, दत्तमंदिर परिसरातील भाजीपाला विक्रेत्यांना नवरंग जलकुंभाजवळील मनपाच्या जागेत तात्पुरते स्थलांतरित करून तेथेही २०० ते २५० शेडस्वरूपातील ओटे बांधणे आदी कामे पूर्ण करून घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवरील कामेही युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात येत आहेत. पाचकंदीलसह आग्रा रोड मोकळा झाल्यानंतर सर्वसामान्य धुळेकरांनीही या पर्यायांचे स्वागत केले आहे. असे असतांना तथाकथित दलबदलू पुढाऱ्यांनाच आमदार अग्रवाल यांच्या सर्वमांन्य कृति विरोधात पोटशूळ का उठला, असा प्रश्न परदेशी यांनी उपस्थित केला आहे.
गरिबांच्या तोंडातील घास हिसकावून तोडपाणी करण्याची आमदार अग्रवाल यांना गरज नाही. ज्याचे साधे किराणा दुकानसुद्धा नाही, तो महागड्या चारचाकी वाहनातून फिरतो कसा, याचेही उत्तर द्यावे. केवळ रस्ते,गटारी करणे हाच विकास नाही, तर शहराचे चलन वाढेल,रोजगार मिळेल यासाठी प्रयत्न हवेत, असे परदेशी यांनी नमूद केले आहे.