उर्वरित महाविद्यालयांविरोधात आंदोलन छेडण्याचा छात्रभारतीचा इशारा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्य़ातील विविध कनिष्ठ महाविद्यालयाकडून घेण्यात आलेले अतिरिक्त शुल्क परत करण्याबाबत छात्रभारती संघटनेकरवी तीन वर्षांपासून चाललेल्या आंदोलनास यश आले आहे. सततच्या पाठपुराव्यामुळे शहरातील चार ते पाच महाविद्यालयांनी हे शुल्क परत करण्यात सुरुवात केली आहे. त्यांची रक्कम जवळपास ३० लाखाच्या घरात पोहोचली आहे. उर्वरित महाविद्यालयांनी पुढील दोन दिवसात अतिरिक्त शुल्क परत न केल्यास महाविद्यालय बंदचा इशारा देण्यात आला आहे.

संघटनेच्या वतीने अतिरिक्त शुल्क परताव्यासह इयत्ता ११ वी आणि १२ वीमध्ये मुलींना मोफत प्रवेश असतांना त्यांच्याकडून शुल्क आकारण्यात असल्याच्या मुद्दय़ावर संघर्ष करीत आहे. मुलींकडून आकारलेले शुल्क परत करणे, कायद्यान्वये कोणत्याही प्रकारचा विकास निधी घेण्यावर बंदी असतांना अनेक महाविद्यालय मोठय़ा प्रमाणावर निधी घेत आहे.

या संस्थावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, विद्यार्थ्यांचे प्रवेश ऑनलाइन करण्यासाठी महाविद्यालयाने मोफत इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून द्यावी आदी मागण्या संघटना करीत आहे. मात्र याबाबत महाविद्यालयांनी नेहमीच चालढकल केली. निदर्शने, ठिय्या असे मार्ग अवलंबूनही महाविद्यालय प्रशासन प्रतिसाद देत नसल्याने त्यांच्याकडून अतिरिक्त शुल्क परतावा व्हावा यासाठी काही दिवसांपूर्वी रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित जिल्ह्य़ातील प्राचार्याची बैठक संघटनेने उधळून लावली होती. त्या वेळी साहाय्यक शिक्षण उपसंचालक गोविंद यांनी प्राचार्याना अतिरिक्त शुल्क परत करण्याचे तोंडी आदेश दिले.

या आदेशाला प्रतिसाद देत शैक्षणिक वर्ष २०१५-२०१६ मधील अतिरिक्त शुल्कापोटी आरवायके विज्ञान महाविद्यालयाने प्रत्येकी १२००, एचपीटी कला महाविद्यालयाने ८०० तसेच बीवायके वाणिज्य महाविद्यालयाने प्रत्येकी ८००, भोसला महाविद्यालयाचे २०० रुपये प्रमाणे अतिरीक्त शुल्क परत केले आहे. आतापर्यंत झालेल्या परताव्याची रक्कम ३० लाखापर्यंत असल्याची माहिती छात्रभारतीने दिली आहे. महाविद्यालय प्रशासनाच्या कामाची दखल घेऊन संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

या महाविद्यालयांनी अतिरिक्त शुल्क परत केले असले तरी उर्वरित महाविद्यालयांचे काय, असा प्रश्न शिक्षण उपसंचालकांसमोर उपस्थित करण्यात आला आहे. त्यांनी अतिरिक्त शुल्क परत न करणाऱ्या महाविद्यालयांविरुद्ध प्रशासकीय कार्यवाहीचे प्रस्ताव तयार करण्यात येतील, असा इशारा दिला आहे.

पुढील महिन्यात कनिष्ठ महाविद्यालये गजबजण्यास सुरुवात होईल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन संघटनेने केले. अतिरिक्त शुल्काचा परतावा न करणाऱ्या महाविद्यालयांमध्ये महाविद्यालय बंदची हाक दिली जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष सागर निकम, शहराध्यक्ष राकेश पवार, विशाल रणमाळे यांनी दिला. विद्यार्थ्यांनी आपल्या अडचणींविषयी ७७०९६ २३४१२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Additional charges return by some colleges in nashik
First published on: 30-06-2016 at 04:27 IST