नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत गोडसे आणि दिंडोरीतून डॉ. भारती पवार या महायुतीच्या उमेदवारांनी गुरुवारी शक्तिप्रदर्शन करुन अर्ज भरण्यात आले. शक्तिप्रदर्शनासाठी आवश्यक मनुष्यबळ जमा करताना राजकीय मंडळींना तारेवरची कसरत करावी लागली. लग्नसराईची धामधूम असल्याने वऱ्हाडाच्या सरबराईत दंग असलेल्या मंडळींना राजकीय फेरीत आणण्यासाठी पायघड्या टाकाव्या लागल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरण्यापूर्वी महायुतीकडून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या प्रदर्शनासाठी आवश्यक असलेले कार्यकर्ते मिळवतांना अनेक अडचणी आल्या. पूर्वनियोजित वेळेपेक्षा फेरी उशीराने सुरू झाली. यावेळी जमा झालेली गर्दी सातत्याने इतस्तत: पसरत राहिली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून विशेषत: दिंडोरी, कळवण, पेठ, सुरगाणा या ठिकाणाहून आदिवासी नागरिक गाड्या भरून बी. डी. भालेकर मैदानापर्यंत आले. या ठिकाणी या गर्दीला आणणाऱ्या प्रमुखांना प्रतीमाणशी काही रक्कम देण्यात आली होती. गाडीत १० पेक्षाअधिक व्यक्ती अपेक्षित असतांना प्रत्यक्षात तीन ते चारच जण होते. गाडीतून उतरल्याच क्षणी फेरी सुरू होण्यापूर्वी नाश्त्याचा आस्वाद घेत असताना अनेकांनी पैसे मागून घेतले. त्यात ठरलेल्या रकमेपेक्षा कमी पैसे मिळाल्याने वादही झाले.

हेही वाचा…नाशिक, दिंडोरीत महायुतीचा एकदिलाने प्रचार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा

सध्या लग्नसराईमुळे वेगवेगळे कार्यक्रम सुरू असल्याने निवडणूक फेरी किंवा प्रचारासाठी कार्यकर्ते मिळवतांना राजकीय पक्षांना अडचणी येत आहेत. कार्यकर्त्यांनी कमी रुपये देण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त केली. येण्या जाण्याची व्यवस्था असली तरी भर उन्हात चालावे लागत असल्याने अनेक जण फेरीत सहभागी होणे टाळतात.