जळगाव : राज्यात महायुतीची सत्ता असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागल्यापासून भाजपसह राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेनेत (एकनाथ शिंदे) फार एकोपा राहिलेला नाही. जळगाव जिल्ह्यातही त्याची प्रचिती काही दिवसांपासून येत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसने आता थेट भाजपच्या बालेकिल्ल्यास सुरूंग लावण्याचे डावपेच आखले आहेत. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी खुद्द त्यासाठी जळगावात तंबू ठोकला आहे.

जळगावात लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर महायुतीचे तिन्ही घटक पक्ष सुरूवातीचे काही दिवस हातात हात घालून फिरताना दिसून आले होते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागताच प्रत्येकाची राजकीय महत्वाकांक्षा जागृत झाली. जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या, जळगाव महापालिका आणि इतर नगरपालिका काबीज करण्यासाठी प्रत्येक पक्ष स्वबळाची भाषा करू लागला. नेते बाजुला राहिले सर्वात आधी पक्षांचे जिल्हाध्यक्ष एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकू लागले. स्वबळावर सत्ता काबीज करायची म्हटली तर त्या ताकदीचे उमेदवार आपल्या पक्षात असावे म्हणून दुसऱ्या पक्षांचे लोक आपल्या पक्षात घेण्याची महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये स्पर्धा सुरू झाली.

दुसऱ्या पक्षाच्या लोकांना आपल्याकडे घेताना चांगले पारखून घेण्याचे सूत्र महायुतीत ठरले होते. प्रत्यक्षात ते सूत्रही नंतरच्या काळात पायदळी तुडवले गेले. महायुतीचे घटक पक्ष एकमेकांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची फोडाफोडी करण्यासही मागे पुढे पाहत नसल्याचे कालांतराने दिसून आले. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यात अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार गटाच्या दोन माजी मंत्र्यांसह दोन माजी आमदारांना आपल्या पक्षात घेऊन सर्वात आधी मोठी बाजी मारली होती. ज्यामुळे शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीरपणे नाराजी देखील व्यक्त केली होती. परंतु, अजित पवार गटाने कोणालाच जुमानले नाही.

तेवढ्यावरच न थांबता अजित पवार गटाने आता काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्यासह इतर बऱ्याच दिग्गजांना आपल्या पक्षात प्रवेश घेण्यासाठी जळगावात रविवारी मेळाव्याचे आयोजन केले आहे. ज्या ठिकाणी लोकसंघर्ष मोर्चाचे १५ ते २० हजार कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जळगावमधील मेळाव्याच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून सुरू असताना भाजपसह शिंदे गटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचा पुढील अध्यक्ष आणि जळगाव महापालिकेचा पुढील महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा राहील, असा दावा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी मेळाव्याच्या आधी केल्याने भाजपसह शिंदे गटाची चलबिचल आणखी जास्त वाढली आहे.