जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा जिल्ह्यात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत जळगावमध्ये १७ तारखेला पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी काँग्रेसच्या काही दिग्गजांचा अजित पवार गटात प्रवेश होणार असून, त्यामध्ये एका मोठ्या महिला नेत्याचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. शरद पवार गटानंतर काँग्रेससाठी तो एक मोठा धक्का मानला जात आहे.

माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ.सतीश पाटील यांच्यासह माजी आमदार कैलास पाटील, दिलीप सोनवणे यांचा अजित पवार गटातील प्रवेशाचा सोहळा जळगावमध्येच पार पडणार होता. आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे स्वतः उपस्थित राहणार होते. मात्र, काही कारणास्तव प्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला. तेव्हा राहून गेलेला मेळावा येत्या १७ तारखेला घेण्याच्या दृष्टीने अजित पवार गटाने नियोजन केले आहे. त्यासाठी जळगावमधील शिवतीर्थ मैदानावर खास पुण्याहून मागविण्यात आलेला भव्य वॉटर प्रूफ मंडप टाकण्याचे काम देखील वेगाने सुरू झाले आहे.

मेळाव्याच्या पूर्व तयारीचा भाग म्हणून अमळनेरचे आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार कैलास पाटील, जळगाव लोकसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, रावेर लोकसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, कार्याध्यक्ष योगेश देसले, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, महानगराध्यक्ष मीनल पाटील, युवक जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. अजित पवार गटाच्या मेळाव्यात जिल्ह्यातील अनेक दिग्गजांचा प्रवेश होणार आहे. सदरचा मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून हजारोंच्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने मेळाव्याची पूर्व तयारी करण्याचे बैठकीत ठरले.

माजी मंत्री देवकर, डॉ. पाटील, माजी आमदार पाटील आणि सोनवणे यांच्या प्रवेशानंतर जळगाव जिल्ह्यातील कोणी मोठा नेता किंवा पदाधिकाऱ्याने अजित पवार गटात अलिकडे प्रवेश केला नव्हता. मात्र, पक्षाच्या १७ ऑगस्टला आयोजित मेळाव्यात काँग्रेसच्या काही तोलामोलाच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होणार आहे. अजित पवार गटात नव्याने प्रवेश करणाऱ्यांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे ते पदाधिकारी नेमके कोण आहेत, त्याची उत्कंठा राजकीय वर्तुळात आहे. विधानसभेच्या निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेसची आधीच गलितगात्र अवस्था झाली आहे. त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असताना जिल्ह्यात एकही आमदार नसला, तरी प्रदेश कार्यकारीणीवर तब्बल सात जणांची नियुक्ती काँग्रेसने यावेळी केली आहे. प्रत्यक्षात त्यानंतरही पक्षाची पडझड थांबण्याचे नाव घेत नसल्याने काँग्रेस चांगलीच हतबल झाल्याचे बोलले जात आहे.