नाशिक : निर्बंधमुक्त वातावरणामुळे अभूतपूर्व उत्साहात साजरा झालेल्या गणेशोत्सवात शुक्रवारी आवडत्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. महानगरपालिकेने जल प्रदूषण रोखण्यासाठी मूर्ती दान करून पर्यावरणस्नेही पध्दतीने विसर्जन व्हावे, यासाठी नैसर्गिक आणि कृत्रिम अशा ७१ स्थळांवर मूर्ती संकलन तसेच निर्माल्य संकलनाची व्यवस्था केली आहे.

मुख्य मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व गणेशोत्सव मंडळांना मिरवणूक मार्गावरून वाजतगाजत मार्गस्थ होता यावे, यासाठी यंदा प्रथमच सकाळी ११ वाजता मिरवणूक निघणार आहे. रात्री १२ पर्यंत मिरवणुकीला परवानगी असल्याने ती रेंगाळू नये म्हणून कठोर नियमावली तयार केली आहे. ध्वनिवर्धकांचा वापर करण्यास प्रतिबंध आहे. मिरवणुकीत छायाचित्रणाद्वारे लक्ष ठेवले जाईल. रेंगाळणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला गेला आहे.

मुख्य मिरवणूक व नाशिक रोड येथील मिरवणुकीसह विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील विसर्जन स्थळांवर सुमारे दीड हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि १०५० गृहरक्षक दलाचे जवान तैनात राहणार आहेत.  करोनाच्या संकटामुळे सलग दोन वर्षे गणेशोत्सव निर्बंधात साजरा झाला होता. यावर्षी सर्व निर्बंध हटल्याने गणेशभक्तांमध्ये संचारलेला उत्साह पाहायला मिळाला. गणरायाला निरोप देताना मंडळांनी वाहनांवर आकर्षक सजावट आणि देखावे साकारण्याचे नियोजन केले आहे. यंदाच्या मिरवणुकीत साधारणत: ३० सार्वजनिक मंडळे सहभागी होण्याचा अंदाज आहे. सकाळी ११ वाजता मुख्य मिरवणुकीला पारंपरिक वाद्यात सुरुवात होईल. मिरवणुकीत दोन मंडळांमध्ये अंतर पडू नये म्हणून प्रत्येक मंडळाला १० कार्यकर्ते कार्यरत ठेवावे लागतील.

विसर्जन मिरवणुकीचे छायाचित्रण केले जाणार आहे. रात्री १२ पर्यंत मिरवणुकीला परवानगी आहे. रस्त्याच्या एकाच बाजूला स्वागत व्यासपीठ, प्रत्येक ठिकाणी आरती नाही, स्वागतोत्सुकांनी खाली उतरून स्वागत करावे असेही सूचित केले आहे. विसर्जनदिनी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. चार उपायुक्त, सात सहायक आयुक्त, ४० निरीक्षक, १२५ उपनिरीक्षक, १३०० कर्मचारी, १०५० गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, शीघ्र कृती दलाची तुकडी तैनात राहणार असल्याचे यंत्रणेकडून सांगण्यात आले.

शहरात ७१ नैसर्गिक, कृत्रिम विसर्जन स्थळे 

मनपाने शहरातील सहा विभागात एकूण ७१ नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळांची निश्चिती केली आहे. यात ४३ ठिकाणी केल्या जाणाऱ्या कृत्रिम तलावांच्या व्यवस्थेचाही समावेश आहे.  गणेशोत्सव पर्यावरणस्नेही पध्दतीने साजरा व्हावा, यासाठी शहरातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता महापालिका गणेश विसर्जन स्थळांवर गणेशमूर्ती आणि निर्माल्य संकलन करणार आहे. घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन नदीपात्रात करू नये. मनपाच्या संकलन केंद्रांवर मूर्ती दान द्याव्यात तसेच निर्माल्य देखील संकलन केंद्रांवर जमा करावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे. सहा विभागांत वेगवेगळय़ा ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मिरवणूक मार्गावरील वाहतुकीवर निर्बंध

शहरातील मुख्य मिरवणूक वाकडी बारव ते गौरी पटांगण आणि नाशिक रोड येथील मिरवणूक बिटको पॉइंट ते दसक घाट अशी निघणार आहे. शहरातील मुख्य मिरवणूक यावर्षी सकाळी अकरा वाजता सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. या पार्श्वभूमीवर, मिरवणूक मार्गावर अन्य कुठल्याही खासगी वाहनांना प्रवेश करता येणार नाही. गणेशोत्सवात होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे आधीपासून नियोजन केले होते. मध्यवर्ती भागातील काही रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली होती. मिरवणूक काळात त्याच धर्तीवर नियोजन करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरवर्षी मिरवणूक मार्गावर येणारे रस्ते लोखंडी जाळय़ा लावून बंद केले जातात. दरवर्षी मिरवणूक सायंकाळी निघत असल्याने तोवर मार्गावरील अन्य लहान-मोठय़ा रस्त्यावरील वाहतूक काहीअंशी सुरू असते. यंदा मात्र तसे होणार नाही. सकाळपासून वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागण्याची चिन्हे आहेत.