प्रशिक्षणानंतर कारगिल येथे पहिलीच नियुक्ती
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील कारकीर्द घडविण्यासाठी नेमकी कशाची निवड करायची, या द्विधा मन:स्थितीत असणाऱ्या युवा वर्गात येथील २२ वर्षांचा अनंत हेमंत देशमुख अपवाद ठरला आहे. बौद्धिक तसेच शारीरिक क्षमतेच्या बळावर त्याने भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदाला गवसणी घातली आहे. सैन्यदलातील खडतर प्रशिक्षणानंतर त्यांना पहिलीच नियुक्ती कारगिल येथे देण्यात आली आहे. या यशानिमित्त नाशिककरांच्या वतीने मंगळवारी सायंकाळी सात वाजता नाशिकरोड येथील उत्सव लॉन्स येथे देशमुख यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
देवळाली येथे देशमुख यांनी पूर्व प्राथमिक आणि दहावीपर्यंतचे शिक्षण नाशिकच्या सेंट झेवियर्स शाळेतून पूर्ण केले. यानंतर निश्चित केल्याप्रमाणे एनडीएमध्ये प्रवेशासाठी दहावी ते बारावीपर्यंतची तयारी एसपीआय या औरंगाबाद येथील संस्थेतून २०१२ ते २०१४ या कालावधीत केली.
सर्व प्रकारचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर नुकतीच त्यांची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट म्हणून नियुक्ती करण्यात आली असून पहिलीच नियुक्ती ही कारगिल येथे देण्यात आली आहे. एनडीएच्या खडतर प्रशिक्षण कालावधीत पायदळ, नौदल, हवाई दल या तीनही शाखांचे शिक्षण दिले जाते. अनंत देशमुख यांनी पायदळाचे प्रशिक्षण डेहराडून, हवाई दलाचे हैदराबाद आणि नौदलाचे प्रशिक्षण चेन्नई येथे पूर्ण केले. सबनीस परिवाराचे यासाठी त्यांना मार्गदर्शन लाभले. डेहराडून येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या पदवी समारंभात नाशिकच्या अनंत देशमुख यांना गौरविण्यात आले.
देशसेवेचे ध्येय
सैन्यात जाऊन देशसेवेचे ध्येय अनंत देशमुख यांनी घेतले होते. त्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. देशमुख यांनी २०१३ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून यश मिळविले. पाठोपाठ २०१४ मध्ये त्यांनी एसएसबीची (सव्र्हिस सिलेक्शन बोर्ड) परीक्षा दिली. केंद्रीय तसेच एसएसबीच्या जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीत देशात ५८ वा क्रमांक त्यांनी मिळविला. या प्रक्रियेद्वारे एनडीएच्या १३२ व्या प्रशिक्षण वर्गासाठी त्यांची निवड करण्यात आली. निवड झाल्यानंतर तीन वर्षांच्या कालावधीत सैन्यदलाचे अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्राप्त केली. यानंतर डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमीत (आयएमए) सैन्यदलातील वर्षभराच्या कालावधीचे खडतर प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले.