सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वीतेविषयी मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री, नाशिकचे पालकमंत्री आदींनी उत्कृष्ट नियोजनाचे प्रशस्तीपत्रक जिल्हा प्रशासनाला बहाल केले असले तरी पोलिसांची दंडेली, नवीन घाटांमुळे झालेली दिशाभूल आणि त्र्यंबक गाठताना करावी लागलेली पायपीट, यामुळे भाविकांमध्ये संतप्त व नाराजीची भावना आहे. नवीन घाट म्हणजे कुशावर्त असल्याचे सांगून प्रशासनाने फसवणूक केल्याचा आरोपही भाविकांनी ही बाब लक्षात आल्यावर केला.
त्र्यंबकेश्वरची तिसरी पर्वणी लाखो भाविकांच्या सहभागामुळे अभूतपूर्व उत्साहात पार पडली असली तरी भाविकांना काही प्रमाणात त्रासदायकही ठरली. शाही स्नानास सुरूवात होण्याच्या काही तास आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुशावर्त तीर्थात कैलास मानसरोवरातील जल अर्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नाशिक-त्र्यंबकमधील सिंहस्थाचे नियोजन पाहून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री चकीत झाल्याचे नमूद केले. प्रशासनाने अतिशय उत्तम व्यवस्था केली. नाशिकच्या पर्वणीनंतर अवघ्या काही तासात नाशिक शहर स्वच्छ करून खऱ्या अर्थाने या कुंभमेळ्यास हरित कुंभ करण्यात आले. या माध्यमातून पंतप्रधानांचे स्वप्नही साकार झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. साधू-संत व भाविकांनी या ठिकाणच्या व्यवस्थेचे कौतुक केले असून हे संपूर्ण श्रेय पोलीस, जिल्हा प्रशासन, त्र्यंबक नगरपालिका आणि इतर शासकीय विभागांचे असल्याचे पशस्तीपत्रकच त्यांनी दिले.
शाही स्नानाच्या दिवशी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी कुटुंबासह त्र्यंबक येथे हजेरी लावली. त्यांनी शासन व प्रशासनाने सिंहस्थासाठी अतिशय उत्तम व्यवस्था केल्याचे सांगितले. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तर बस सेवा काही काळ बंद करूनही भाविक मोठय़ा उत्साहात पायी चालत आल्याचा उल्लेख गौरवाने केला. नाशिक-त्र्यंबकच्या कुंभात तब्बल दोन कोटी भाविक सहभागी झाले. शासन व प्रशासन हा कुंभमेळा सुरक्षित, हरित कुंभ करण्यात यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.
सत्ताधाऱ्यांचा असा दावा असला तरी अनेक भाविकांची मात्र त्या विपरित प्रतिक्रिया व्यक्त केली. रात्रीपासून दुपारी १२ पर्यंत कुशावर्त भाविकांसाठी बंद होते. बाहेरगावहून आलेल्या भाविकांनी नव्याने बांधलेल्या घाटांवर स्नान करत सकाळी ते त्र्यंबक नगरीत दाखल झाले. मंदिराच्या पुढील बाजूस कुशावर्त होते तर शहरात प्रवेश करताना लागलेले घाट काय होते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
नवीन घाट हे कुशावर्त असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. या माध्यमातून प्रशासनाने आमची फसवणूक केल्याची संतप्त प्रतिक्रिया अनेक भाविकांनी व्यक्त केली. साधू-महंतांच्या शाही स्नानावेळी नाशिकहून त्र्यंबककडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. खंबाळेच्या स्थानकातून बसगाडय़ाही सोडल्या जात नव्हत्या. आधी गेलेल्या बसगाडय़ा रस्त्यात ठिकठिकाणी थांबून राहिल्याने भाविकांना पाच ते १५ किलोमीटर पायपीट करणे भाग पडले. यामुळे भाविकांचे कमालीचे हाल झाले. त्यांनी प्रशासनाच्या कार्यशैलीवर कठोर शब्दात ताशेरे ओढले. त्र्यंबक नगरीत मार्गक्रमण करताना पोलीस यंत्रणेच्या दंडेलीचा अनुभव घ्यावा लागल्याचे काहींनी सांगितले. छायाचित्र काढणाऱ्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली. काही  छायाचित्र कॅमेऱ्यातून काढून टाकण्यास फर्मावल्याचा अनुभवही त्यांना घ्यावा लागला.