धुळे : येथे आलेल्या विधिमंडळ अंदाज समितीतील सदस्यांना देण्यासाठी गुलमोहर या शासकीय विश्रामगृहाच्या एका खोलीत पाच कोटी रुपये ठेवले आहेत, असा आरोप शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. बुधवारी सायंकाळी त्यांनी विश्रामगृहातील एका कुलूपबंद खोलीबाहेर ठिय्या दिला आहे.

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय विभागांचा कामांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी विधिमंडळ अंदाज समिती धुळ्यात दाखल झाली आहे. या समितीत विधिमंडळातील २९ सदस्यांचा समावेश आहे. पैकी जवळपास ११ आमदार बुधवारी धुळ्यात दाखल झाले. या समितीत सहभागी असलेल्या आमदारांना देण्यासाठी अधिकाऱ्यांनी पाच कोटी रुपये जमा केले असून ते विश्रामगृहाच्या १०२ क्रमांकाच्या खोलीत ठेवले आहेत, असा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे खाजगी स्वीय सहायक किशोर पाटील यांच्या नावाने ही खोली आरक्षित करण्यात आली असल्याचेही गोटे यांनी सांगितले. १५ मे पासून ही खोली किशोर पाटील यांच्या नावाने आरक्षित करण्यात आली असून या खोलीला लावण्यात आलेले कुलूपदेखील खासगी व्यक्तीचे असल्याचा संशय अनिल गोटे यांनी व्यक्त केला आहे. संशयास्पद खोलीच्या बाहेर त्यांनी ठिय्या दिला आहे.