नाशिक – तब्बल २१०० कोटींच्या थकीत कर्जामुळे अडचणीत सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासकपदी आता विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थेचे उपसहनिबंधक संतोष बिडवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सततचा राजकीय हस्तक्षेप, बँकेला नुकसानकारक ठरणाऱ्या कृती यास कंटाळून आधीचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी राजीनामा दिला होता. नव्या प्रशासकांसमोर बँकेचा परवाना वाचविण्याचे आव्हान आहे.

कधीकाळी राज्यात आघाडीवर असणारी नाशिक जिल्हा बँक संचालक मंडळाच्या मनमानी कारभारा्मुळे काही वर्षांपासून अडचणीत आहे. मोठ्या थकीत कर्जामुळे बँकिंग परवाना रद्द होण्याची टांगती तलवार आहे. या संकटातून बँकेला वाचविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला. थकबाकीदार शेतकऱ्यांना व्याज दरात अधिकची सवलत देणारी नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजनेची संकल्पना मांडली होती. तत्पूर्वी कृषिमंत्री माणिक कोकाटे यांनी बँकेच्या कर्ज वसुलीला स्थगिती देण्याची सूचना केली होती. या निर्णयांनी तोट्यात भर पडणार असल्याने प्रशासक प्रतापसिंह चव्हाण बँकेतून बाहेर पडल्याची चर्चा होती. आता बँकेची जबाबदारी उपसहनिबंधक संतोष बिडवई यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांची या पदाची सूत्रे हाती घेतली. कृती आराखड्यानुसार थकीत कर्ज वसुलीचे लक्ष्य गाठणे, निवडणुकीतील कर्जमाफीच्या घोषणेमुळे ठप्प झालेल्या वसुलीतील अडथळे दूर करणे, बड्या थकबाकीदारांवर कारवाई अशी अनेक आव्हाने त्यांच्यासमोर आहेत.