नाशिक : साधारणत: पावणे तीन वर्षांपूर्वी नाशिक-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर पंचवटीत असलेल्या हॉटेल मिरची चौकाचे नाव संपूर्ण देशात वेगळ्या कारणाने पोहोचले होते. यवतमाळहून मुंबईकडे निघालेली खासगी आराम बस आणि डंपरची याच चौकात धडक झाली होती. यावेळी बसला लागलेल्या आगीत १३ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. आजही या भागातून मार्गस्थ होताना त्या भीषण अपघाताच्या स्मृती वेदनादायी ठरतात. बहुदा यामुळेच की काय, मिरची चौकाच्या नामांतराने त्या पुसल्या जात आहेत. आता हा चौक ‘कोठुळे पाटील चौक’ म्हणून ओळखला जाणार आहे.

पंचवटी विभागात प्रभाग क्रमांक चारमध्ये छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर हॉटेल मिरची चौक आहे. स्थानिकांच्या जमिनी रस्त्यांसाठी संपादित झाल्या असल्याने या चौकाला कोठुळे-पाटील चौक असे नाव देण्याची मागणी होती. या आधारावर नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी महापालिकेला हॉटेल मिरची चौकाचे ‘कोठुळे पाटील चौक’ असे नाव देण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील हॉटेल मिरची चौकाचे ’कोठुळे पाटील चौक‘ असे नामांतर करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

अपघातानंतर महापालिकेसह सर्व संबंधित यंत्रणा खडबडून जागा झाल्या होत्या. ज्या मिरची हॉटेलच्या नावाने हा चौक ओळखला जात असे, त्याच हॉटलसह आसपासचे अतिक्रमण हटविले गेले. गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे आदींतून काही उपाययोजना केल्या गेल्या. परंतु, चौकात झालेल्या त्या अपघाताच्या स्मृती कायम राहिल्या. नामांतराने त्या पुसल्या जातील की नाही हा प्रश्न आहे.

ती पहाट…

आठ ऑक्टोबर २०२२ रोजी पहाटे साडेपाच वाजता हॉटेल मिरची चौकात बस आणि डंपरची धडक झाली होती. धडक इतकी जोरदार होती की, बसची दिशा बदलून ती दुसऱ्या रस्त्यावर काही अंतर फरफटत गेली. धडकेनंतर डंपरच्या इंधन टाकीचा स्फोट झाला. आणि बसने पेट घेतला. काही प्रवाशांनी जिवाच्या आकांताने खिडक्यांच्या काचा फोडून वा संकटकालीन दरवाजातून उड्या घेतल्या. काही प्रवासी मात्र आतच अडकले. त्यांचा होरपळून मृत्यू झाला. ‘चिंतामणी ट्रॅव्हल्स’ची ही बस होती. अक्षरश: कोळसा झालेल्या मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करावी लागली होती.

मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधानांपर्यंत दखल

हॉटेल मिरची चौकातील अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण करून शोक संवेदना व्यक्त केल्या होत्या. केंद्र आणि राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर झाली होती.