नाशिक: पंचतारांकित हॉटेलमध्ये ग्राहक कांदा भजीसाठी सहजपणे ५०० तसेच हजार रुपये मोजतात. मात्र तोच कांदा बाजारात अल्प दरात मागितला जातो. महागड्या मोटारींमधून खरेदी करणारे भाजीपाल्याचे दर जास्त असल्याचे सांगतात. ग्राहकांच्या या मानसिकतेवर बोट ठेवत पालकमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना समृध्द करण्यासाठी ती बदलण्याचा सल्ला दिला. शहरातील एबीबी चौकालगतच्या ठक्कर डोम येथे आयोजित कृषिथॉन २०२२ या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी भुसे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी ग्राहकांना कानपिचक्या देताना समाजाने शेतकऱ्यांच्या कष्टाला माणूस म्हणून न्याय देण्याची आवश्यकता मांडली. शेती व शेतकऱ्यासमोरील प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. ही भावना समाजाच्या मनात येणार नाही, तोवर शेती क्षेत्राचा न्याय निवाडा होऊ शकणार नाही. ग्रामीण भागात अगदी पहाटेपासून केवळ शेतकरी नाही तर त्याचं संपूर्ण कुटुंब, अगदी शाळेत जाणारी लहान मुलेही शेतात राबतात. कष्टातून शेती करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, निसर्गाच्या अडचणी, रोगराई अशा संकटांना तोंड देऊन पीक वाचलेच तर दर मिळत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा >>> मनमाड: पाच, सहा डिसेंबरला रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक; ३८ गाड्या रद्द, प्रवासी संतप्त

मागील काही दिवसात टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यावर प्रक्रिया करता येईल का, यादृष्टीने विचार करावा. शासकीय योजनांच्या माध्यमातून लहान प्रकल्पासाठी शेतकरी गटांना मदत करता येईल. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचा क्रांतिकारी निर्णय इतिहासात प्रथमच घेतला गेला. राज्यात अडीच हजार कोटीहून अधिकची मदत नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजाराचे अनुदान दिले जाते. दुसऱ्या टप्प्यातही रक्कम वर्ग केली जाणार आहे. नाशिक जिल्हा बँकेच्या प्रणालीत ॲप संलग्न न झाल्यामुळे ही प्रक्रिया थांबली होती. मात्र, पुढील आठ ते दहा दिवसात सर्व माहितीची पडताळणी होऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ती रक्कम प्राप्त होईल, असे भुसे यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी प्रदर्शनातील ठिबक सिंचन, ड्रोनद्वारे फवारणी, हवामानाचा अंदाज देणारे ॲप आदी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून ते आपल्या शेतापर्यंत कसे नेता येईल याचा विचार करावा. शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा >>> नाशिक: डिसेंबरपासून शहरात पुन्हा हेल्मेट सक्ती ; अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी पाऊल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खा. हेमंत गोडसे यांनी प्रदर्शनातून उत्तम शेती करण्याचा मार्ग सापडतो. त्यामुळे युवा वर्ग शेतीकडे वळत असून आधुनिक शेती पध्दतीचे त्यांना मार्गदर्शन मिळत असल्याचे नमूद केले. संयोजक साहिल न्याहारकर यांनी गेल्या १५ वर्षांपासून प्रदर्शनाचे आयोजन केले जात असून यंदा ४५ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केल्याचे सांगितले. प्रदर्शनात ३०० हून अधिक कंपन्यांचे कक्ष आहेत. कार्यक्रमास रश्मी हिरे, आयोजक संजय न्याहारकर, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, देविदास पिंगळे, विजय पाटील हेही उपस्थित होते.