नाशिक : जुन्नर, मराठवाडा, नाशिक, अहिल्यानगर सध्या सर्वत्र बिबट्यांचा संचार आणि हल्ले हा एकच विषय चर्चिला जात आहे. जुन्नरमध्ये तर मानवांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला विशेष परवानगीने ठार मारण्यात आले. परंतु, सर्वत्र असे करण्यास परवानगी मिळणे अशक्य असल्याने नागरिकांमध्ये भीती कायम आहे. नाशिकरोड परिसरही बिबट्याच्या हल्ल्यांनी त्रस्त आहे. बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न करण्यात येत असताना आता देशवासियांच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असलेल्या लष्कराची मदत मिळणार आहे.
नाशिक रोडच्या जयभवानी रोड तसेच इतर नागरी भागात बिबट्यांचा संचार वाढला आहे. देवळाली कॅम्प भागात लष्कराचे आर्टिलरी सेंटर आहे. या सेंटरच्या हद्दीतून बिबटे येत असतात. मागील महिन्यात बिबट्याने वडनेर भागात दोन बालकांचे बळी घेतले. अनेक पाळीव जनावरे फस्त केली आहेत. बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाकडून ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात येतात. त्यात बिबटे अडकतातही. परंतु, बिबट्यांची संख्या अधिक असल्याने त्यांचे हल्ले सुरुच आहेत. आता बिबट्यांना रोखण्यासाठी कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिगेशन ट्रेनिंग सेंटर (कॅट) तसेच आर्टिलरी सेंटर सीमेवर लष्करातर्फे संरक्षत भिंतीची दुरूस्ती केली जाणार आहे. सीमेवर दिवे लावण्यात येणार आहेत भिंतीची उंची वाढविण्याचे काम सुरू झाले आहे.
शिवसेना (ठाकरे गट) युवा सेनेच्या पदाधिकारी योगिता गायकवाड यांनी याप्रश्नी लष्करी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. जय भवानी रोड, डावखरवाडी, मनोहर गार्डन, धोंगडे मळा आणि नाशिक रोडच्या इतर नागरी भागात दिवसाढवळ्या बिबटे येतात. योगिता गायकवाड यांनी आर्टिलरी सेंटर, संरक्षण मंत्रालयाला निवेदन पाठविले होते. त्याची दखल घेत संरक्षण सचिव आणि संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले.
लष्कराच्या अधिकाऱ्यांनी योगिता गायकवाड आणि रहिवाशांसह संरक्षक भिंतीची पाहणी केली असता भिंत ठिकठिकाणी तुटलेली, कमी उंचीची, तारांचे कुंपण नसलेली दिसली. लष्करी केंद्राचे लेफ्टनंट. कर्नल मंजित सिंग यांनी धोंगडे मळा, मनोहर गार्डन, डावखर वाडी,लोणकर मळा, जय भवानी रोड आणि गायकवाड मळा परिसरातील तुटलेल्या संरक्षक भिंतींची दुरूस्ती लवकरच केली जाईल, असे पत्राव्दारे कळविले. त्यानंतर आता भिंतीची उंची वाढविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आर्टिलरी सेंटरच्या सीमेवर दिवे लावण्यात येणार आहेत.
ब्रिगेडियर एन. आर. पांडेय यांनी योगिता गायकवाड यांच्याशी झालेल्या चर्चेत याआधी केलेल्या आणि भविष्यातील कामांची माहिती दिली. ब्रिगेडियर पांडे यांनी सांगितले की, काम लवकरच सुरू केले जाईल. आतील बाजूचा सीमा परिसर स्वच्छ करण्यात आला असून त्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी जागा राहिलेली नाही. या सीमेलगत लष्कराच्या घोड्यांसाठी मार्ग तयार केला जाणार आहे, ज्यामुळे रोज घोड्यांची हालचाल होईल. आणि त्यामुळे जंगली प्राण्यांचा वावर कमी होईल.
नाशिक महापालिकेने लष्करी सीमेगतची मोठी झाडे योग्य प्रकारे छाटल्यास त्या झाडांच्या सहाय्याने बिबटे एका भागातून दुसऱ्या भागात जाऊ शकणार नाहीत. याबाबत महापालिकेला निवेदन देण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. लष्करी प्रशासनाला या कामासाठी रहिवासी सहकार्य करतील. या प्रश्नावर आम्ही बिऱ्हाड आंदोलन केले होते. वेळोवेळी आवाज उठविला. लष्कर व संरक्षण मंत्रालयाशी पत्रव्यवहार करून त्वरित उपाययोजना होण्यासाठी दिल्लीला जाऊन संरक्षण राज्यमंत्री आणि संरक्षण विभागाचे सचिव यांची भेट घेणार असल्याचेही संगिता गायकवाड यांनी सांगितले.
